तलावातील गाळासंदर्भात ३ महिन्यात कृती आराखडा तयार करा; पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश
26-Jun-2025
Total Views | 10
मुंबई : पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी बुधवार, २५ जून रोजी दिले.
मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पवई तलावातील गाळ काढण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्यासह पर्यावरण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "पवई तलावचा परिसर हा ५५७ एकरावर आहे. या तलावात परिसरातील सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे जलपर्णी वाढली आहे. हे सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. पवई आणि तुळशीविहार तलावातील गाळ काढल्यानंतर त्याची वाहतूक तसेच साठवणुकीसंदर्भात अभ्यास अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करावा. गाळ काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत घेण्यात यावी," अशा सूचना त्यांनी दिल्या.
दरवर्षी जुलैमध्ये पवई तलाव भरून वाहतो. मात्र, यंदा जून महिन्यातच हा तलाव भरून वाहू लागला आहे. गाळ न काढल्यामुळे हा तलाव लवकर भरला का?, तलावातील हा गाळ काढण्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत यावेळी चर्चा झाली. तसेच पवई तलावातील प्रदुषणासंदर्भात मेरी या संस्थेने सर्वेक्षण केले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.