नवी दिल्ली, बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने ९७२ लोकांची ‘हिटलिस्ट’ तयार केली होती, ज्यामध्ये केरळच्या माजी जिल्हा न्यायाधीशाचे नाव देखील समाविष्ट होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोची येथील न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमधून हे उघड झाले आहे.
एनआयएच्या कागदपत्रांनुसार, पीएफआयने त्यांच्या गुप्त 'रिपोर्टर्स विंग' द्वारे अन्य धर्मातील लोकांचे पदनाम, नाव, वय, छायाचित्र यासारखी वैयक्तिक माहिती गोळा केली. 'रिपोर्टर्स विंग', 'फिजिकल अँड आर्म्स ट्रेनिंग विंग/पीई' आणि 'सर्व्हिस विंग/हिट टीम्स' याद्वारे पीएफआयने हे काम केले होते. 'रिपोर्टर्स विंग'ने समाजातील प्रमुख व्यक्तींची तसेच इतर समुदायांच्या, विशेषतः हिंदू समुदायाच्या नेत्यांची खाजगी आणि वैयक्तिक माहिती गोळा केली, ज्यामध्ये त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा समावेश होता असे एनआयएने म्हटले आहे.
पीएफआयच्या जिल्हा पातळीवर डेटा संकलित केला जातो आणि त्यांच्या राज्य कार्यकर्त्यांना कळवला जातो. तपशील नियमितपणे अपडेट केले जातात आणि गरजेनुसार दहशतवादी टोळी व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी वापरतात, असेही एनआयने न्यायालयास सांगितले आहे. एस. के. श्रीनिवासन हत्या प्रकरणात एनआयएने हे खुलासे केले आहेत.