आदिवासी वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये दुपटीने वाढ

    25-Jun-2025
Total Views | 5
 
Allowance for students in tribal hostels doubled
 
मुंबई : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे, यासाठी राज्यभरात विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसत‍िगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यांमध्ये सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली असून शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय मंगळवार, दि. २४ जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 
महागाई निर्देशांकाचा विचार करून या भत्त्यांच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांत कोणतीही वाढ न मिळाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आता सुधारित दरानुसार अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे. राज्यात एकूण ४९० वसतिगृहे सुरू असून, त्यापैकी २८४ मुलांची आणि २०६ मुलींची वसतिगृहे आहेत. यामध्ये एकूण ५८ हजार ७०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
 
नवीन सुधारित दर
 
निर्वाह भत्ता (दरमहा)
 
विभागीय स्तरासाठी: १,४०० रुपये (पूर्वी ८०० रुपये)
जिल्हा स्तरासाठी: १,३०० रुपये (पूर्वी ६०० रुपये)
ग्रामीण/तालुका स्तरासाठी: १,००० रुपये (पूर्वी ५०० रुपये)
मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ता: १०० रुपयांवरून १५० रुपये इतका वाढवण्यात आला आहे.
 
शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक)
 
इयत्ता ८ वी ते १० वीसाठी: ४,५०० रुपये (पूर्वी ३,२०० रुपये)
११ वी, १२ वी व पदविका अभ्यासक्रमासाठी: ५,००० रुपये (पूर्वी ४,००० रुपये)
पदवी अभ्यासक्रमासाठी: ५,७०० रुपये (पूर्वी ४,५०० रुपये)
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी: ८,००० रुपये (पूर्वी ६,००० रुपये)
आहार भत्ता (दर महिना)
महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहांसाठी: ५,००० रुपये (पूर्वी ३,५०० रुपये)
जिल्हा स्तरावरील वसतिगृहांसाठी: ४,५०० रुपये (पूर्वी ३,००० रुपये)
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121