ठाणे : मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पांच्या अंतर्गत स्ट्रक्चरल गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे. यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यानुसार, २२ जून ते १४ जुलै या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत घोडबंदर रोडवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
स्ट्रक्चरल गर्डर बसवण्याचे काम नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा या दोन प्रमुख भागांमध्ये केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण म्हणजेच एमएमआरडीए आणि त्यांचे भागीदार हे काम रात्रीच्या वेळेत पूर्ण करणार आहेत. वाहतुकीचा अडथळा कमी व्हावा या उद्देशाने ही कामे रात्री केली जाणार आहेत. मात्र यामध्ये पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर तसंच, अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच, इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाने केले आहे.
गायमुख मेट्रो स्टेशनजवळ तुळई उभारणीच्या कामासाठी ठाणे- घोडबंदर दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून ते पिलर क्रमांक ८५ जवळून विरुद्ध दिशेने वळतील आणि घोडबंदर-ठाणे मुख्य मार्गावरुन पुढे जाऊन पिलर क्रमांक १०२ येथे डाव्या बाजूसवळून इंडियन ऑईल पंपसमोरुन मुख्य रस्ताने पुढे जातील. या कामाच्या दरम्यान हलकी वाहने पिलर क्रमांक ८५ जवळून सेवा मार्गे इंडियन ऑईल पंपसमोर मुख्य रस्त्यावर येऊन पुढे जातील.
घोडबंदर-ठाणे वाहिनीवर नागलाबंदर परिसरात तुळई बसवण्याचे काम सुरू असताना ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नागलाबंदर सिग्नल आशा वाईन शॉपजवळून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून नागलाबंदर येथील डिपी क्रमांक ७२,७३ व आशा वाईन शॉपजवळून सेवा मार्गाने लोढा स्प्लेन्ड्रा येथे घोडबंदर-ठाणे मुख्य रस्त्यावर येऊन पुढील प्रवास करता येईल.