मुंबई : उबाठा गटाने मागच्या तीन वर्षात नुसताच बोभाटा करण्याचे काम केले. त्यामुळे उबाठा गटाचे यापुढे बोभाटा गट असे नाव ठेवावे, असा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळी डोम येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "इथे जमलेत स्वाभिमानी मावळे आणि तिकडे जमलेत सत्तेच्या पिंडाला चटावलेले कावळे. मागच्या तीन वर्षांत बाप चोरला, बाण चोरला, पक्ष चोरला यापलीकडे तुम्हाला काहीच करता आले नाही. नुसतेच बोभाटा करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे उबाठा गटाचे यापुढे बोभाटा गट असे नाव ठेवावे. हे नाव त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने शोभून दिसेल."
"मागच्या वर्धापन दिनावेळी फेक नरेटिव्हच्या नादात महाविकास आघाडी सत्तेची स्वप्न बघत होती आणि महायूती थोडी चिंतेत होती. सगळीकडे संकटाचे वातावरण असताना लाडकी बहिणसारखी धाडसी योजना आणून एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणूकीत महायूतीचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महायूतीला भरघोस जनादेश मिळाले. महायूतीच्या विजयाचे शिल्पकार हे एकनाथ शिंदे साहेब आहेत," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे ६० आमदार आणि महायूतीचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. उबाठा गटाचे मात्र, १०० लढवून २० आमदार निवडून आलेत. महाराष्ट्राची जनता हुशार आहे. लढवले १०० आले २०. लोकांना माहिती आहे ते आहेत ४२० म्हणून त्यांचे आमदार आलेत २०," असा टोलाही ज्योती वाघमारेंनी लगावला आहे.