मुंबई : बॉलीवूडचा किंग खान – शाहरुख खान – यंदाच्या मेट गाला 2025 मध्ये आपल्या खास अंदाजात पदार्पण करताना दिसला. जगभरातील चाहते जिथं त्यांच्या एका झलकसाठी आतुर असतात, तिथं अमेरिकेतील परदेशी माध्यमांपुढे शाहरुखला स्वत:चं नाव सांगावं लागलं. “I am Shah Rukh,” असं स्वतःचं ओळख करून देताना शाहरुखचा साधेपणा आणि आत्मविश्वास दोन्ही झळकले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मेट गालाच्या रेड कार्पेटवर अनेक विदेशी पत्रकारांनी शाहरुखकडे माइक पुढे करत त्याची ओळख विचारली. यावर शाहरुखने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं – “I am Shah Rukh.” यावेळी त्याच्या पोशाखाची चर्चा रंगली, जो सुप्रसिद्ध भारतीय डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केला होता.
शाहरुखचा पोशाख आणि सब्यसाची यांची खास कल्पना
या रेड कार्पेटवरील एका मुलाखतीत सब्यसाची आणि शाहरुखने त्यांच्या पोशाखाविषयी संवाद साधला. सब्यसाचीनं सांगितलं की, शाहरुख हा केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात सर्वात मोठा सुपरस्टार आहे आणि मेट गालासाठी निघताना त्यांच्या हॉटेलबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीमुळे अक्षरशः भगदाडाची स्थिती निर्माण झाली होती.
शाहरुखनं या पहिल्या मेट गालाविषयी सांगितलं की, “थोडंसं नर्व्हस वाटतंय... पण हे सगळं मी माझ्या मुलांसाठी करतोय.” पोशाखाविषयी त्याचं एकच मागणं होतं – "ते काळं किंवा पांढरं असावं." त्यानं हे देखील स्पष्ट केलं की, त्याला पोशाखात आरामदायक वाटणं महत्त्वाचं आहे – आणि तसंच झालं.
शाहरुखने मेट गालासाठी काळ्या रंगाचा क्लासिक सूट परिधान केला होता, ज्यात अनेक स्तरांतील नेकलेसेस होते आणि हातात वाघाच्या डोक्याच्या आकृतीसह स्टायलिश केन घेतलेली होती. त्याचा हा लूक राजस आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक ठरला.
मेट गाला २०२५ : थीम आणि वैशिष्ट्यं
यंदाच्या मेट गालाची थीम होती — Superfine: Tailoring Black Style. या थीमद्वारे काळ्या रंगाच्या फॅशनचा सांस्कृतिक प्रवास उलगडण्यात आला. 18व्या शतकापासून आधुनिक काळापर्यंत काळ्या फॅशनने समाजात आणि कलात्मकतेत घेतलेली वळणं या प्रदर्शनात अधोरेखित करण्यात आली.
ही संकल्पना मॉनिका एल. मिलर यांच्या Slaves to Fashion (२००९) या प्रभावी पुस्तकावर आधारित आहे. क्युरेटर अँड्रू बोल्टन यांनी या प्रदर्शानाची आखणी करताना ‘ब्लॅक डॅंडी’ या शैलीच्या आत्मप्रतीकत्वाचा वेध घेतला आहे.
शाहरुख खानने आपल्या पहिल्यावहिल्या मेट गालामधून केवळ भारतीय सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व केलं नाही, तर ग्लोबल फॅशन स्पेसमध्येही आपली वेगळी छाप सोडली. त्याचा सहज, आत्मविश्वासपूर्ण आणि सौंदर्यदृष्ट्या परिपूर्ण अंदाज प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवून गेला.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.