- कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन
01-May-2025
Total Views |
मुंबई: ( Call Hindu digital platform on the occasion of Akshaya Tritiya ) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात ‘कॉल हिंदू’ या खासगी डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.
याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यांसारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. ‘हिंदू जागरण मंचा’चे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून हे डिजिटल व्यासपीठ साकारण्यात आले आहे. याबाबत बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “कॉल हिंदू’ यासारख्या डिजिटल उपक्रमांमुळे समाजाची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती शक्य होते. या पुढाकारासाठी निर्मात्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या उपक्रमाद्वारे तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी सरकार म्हणून आम्ही सहकार्य करू.
कौशल्य विकास विभाग विविध माध्यमांच्या मदतीने तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे, आता यासोबत ‘कॉल हिंदू’ व्यासपीठाचादेखील वापर करू.”
या वेबसाईटच्या माध्यमातून रोजच्या जीवनाशी निगडीत विविध सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. यात राष्ट्रभक्तीला समर्पित माहिती व उपक्रम, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, घरबसल्या मंदिरांचे दर्शन घेता येईल, अशी सेवा तसेच समाजाभिमुख ई-कॉमर्स आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणारे डिजिटल बाजार यांचा समावेश आहे.
विवाह जुळवण्यासाठी एक विशेष विभाग आहे. तसेच, कुटुंबासोबत धार्मिक स्थळांना सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाच्या योजना आखणे या वेबसाईटच्या माध्यमातून शक्य होणार आहे. आज रोजगार विषयक सेवा सुरू झाली, असून लवकरच इतर सेवासुद्धा लोकांना वापरायला मिळणार आहेत. पुढच्या टप्प्यात लवकरच याचे अॅप्लिकेशन तयार होणार आहे.