पवारांनी फावल्या वेळेत त्यांना हवा तसा इतिहास लिहावा! गोपीचंद पडळकर यांची टीका

    16-Apr-2025
Total Views |
 
Gopichand Padalkar & Sharad Pawar
 
मुंबई : शरद पवारांकडे सध्या फावला वेळ आहे. त्यामुळे त्यांनी या फावल्या वेळेत स्वत: दोन वर्षे बसून त्यांना हवा तसा इतिहास लिहावा, अशी खोचक टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी माध्यमांशी संवाद साधला.
 
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "वाघ्या कुत्र्याच्या सुरक्षेसाठी आणखी दहा वीस पोलिस वाढवण्याची आवश्यकता आहे. संभाजी ब्रिगेडने हा विषय पुढे आणला असून तो अत्यंत निंदनीय आहे. औरंगजेबाच्या कबरीबाबत आमचे दुमत नाही असे संभाजी ब्रिगेडचे विधान आहे. हा नालायकपणा महाराष्ट्रात दुसरे कुणीही करू शकत नाही. ब्राम्हणांच्या विरोधात वातावरण करण्याचा हेतूने संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ टोकाचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या इतिहासकारांनी मांडलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याशी सर्वांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सरकारने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी."
 
हे वाचलंत का? -  महिला आयोग आपल्या दारी! महिलांच्या न्यायासाठी अनोखा उपक्रम
 
"उदयनराजे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पंरतू, हे खुसपट ब्रिगेडने काढले. त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो, सत्ता जाते तेव्हा शोधून शोधून असे विषय काढले जातात. शरद पवारांना फॉर असलेल्या या संघटना नवीन नवीन इतिहास बाहेर काढतात आणि त्यामुळे हे वाद तयार होतात. सगळे इतिहासकार पवारांना फॉर राजकारण करण्यासाठी नवीन इतिहास लिहीतात आणि त्यामुळे वाद होतात. त्यामुळे शरद पवारांकडे आता फावला वेळ आहे. या फावल्या वेळेत त्यांनी स्वत: दोन वर्षे बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास लिहावा. त्यांनी एकदाच इतिहास लिहावा म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची गरज नाही," अशी टीका त्यांनी केली.
 
फुले चित्रपटावर बोलताना ते म्हणाले की, "महाराष्ट्रात जात बघून इतिहास काढायचा ही पद्धतच सुरु आहे. जेव्हा जेव्हा सत्ता जाते तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात खूप इतिहासकार जागे होतात. गेल्या दहा पंधरा वर्षात नवीन इतिहासकार लाँच झाले आहेत. २५० रुपयांचे जॅकेट घालून हे इतिहासकार फिरत असतात आणि त्यांना पाहिजे तसा इतिहास लिहितात."
 
धनगरी नाद कार्यक्रमाचे आयोजन
 
"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शिवमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे. एकाचवेळी ५० हजार धनगरी ढोल वाजवून अहिल्यादेवींना अभिवादन करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे अहिल्याभक्तांनी ठरवले आहे," अशी माहितीही यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिली.