मुंबईतील २८ हजार सफाई कामगारांचा रखडलेला घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार
मुख्यमंत्र्यांचे भाई गिरकर यांना आश्वासन!
07-Mar-2025
Total Views |
मुंबई ( Devendra Fadanvis ) : मुंबईतील २८ हजार सफाई कामगारांच्या रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरुवारी माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांना दिले.
उत्तन भाईंदर येथे भाई गिरकर यांनी सफाई कामगारांच्या प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ४ एफ.एस.आय देऊन पारित केलेल्या शासन निर्णयानुसार सदरहू घरांची उभारणी करण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली.
तसेच कुलाबा येथील पंचशील नगर, राजवार्डकर स्ट्रीट येथे सुरू असलेल्या वसाहतीच्या निकृष्ठ कामाची चौकशी करून तातडीने कामाला स्थगिती देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. मुंबईतील ईतर ठिकाणी तांत्रिक तसेच विविध कारणास्तव रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांच्या वसाहतीचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी देखील निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. या सर्व विषयांची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी भाई गिरकर यांना यावेळी दिले.