भारतावरही 2 एप्रिलपासून शुल्कवाढ; ट्रम्प यांची घोषणा

कॅनडा, मेक्सिको, चीनचेही अमेरिकेला प्रत्युत्तर

    06-Mar-2025
Total Views |

Trump announces Duty hike on India from April 2
 
वॉशिंग्टन : ( Trump announces Duty hike on India from April 2 ) भारतावर ‘रेसिप्रोकल’ आयात शुल्क लादण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही जाहीर केला होता. पण, अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवार, दि. ४ मार्च रोजी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी दि. २ एप्रिलपासून करणार असल्याचे जाहीर केले.
 
भारतासोबतच चीन, कॅनडा आणि मॅक्सिको या देशांविरोधात देखील ट्रम्प यांनी १५ ते २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात चीन, कॅनडा आणि मॅक्सिको या देशांनीही अमेरिकेला शुल्कवाढीचा इशारा दिला आहे.
 
कॅनडानेही अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. “आयात शुल्काच्या आडून जर कॅनडाचे नुकसान ट्रम्प यांना करायचे असेल, तर आम्ही त्यांचा वीजपुरवठा खंडित करू,” असा इशारा ओंटारियोचे प्रीमिअर डग फोर्ड यांनी दिला आहे. मॅक्सिकोनेही लवकरच नवीन धोरण जाहीर करणार असल्याचे सांगितले असून, चीनने अमेरिकेवरील आयात शुल्कामध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. चीनने अमेरिकेच्या २५ टक्के कंपन्यांना मालाची निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. तसेच “अमेरिका जर कोणत्याही प्रकारचे आर्थिक युद्ध चीनबरोबर करू इच्छित असेल, तर चीनही युद्धास तयार असून, आम्ही अखेरपर्यंत हे युद्ध लढू,” असे अमेरिकेतील चिनी दुतावासाने म्हटले आहे.
 
ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या उद्योगजगताकडून विरोधाचे सूर उमटले असून, डॉलरच्या मूल्यातही घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्याभरात डॉलर्सच्या किमतीत दीड टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या धोरणावर प्रसिद्ध जागतिक गुंतवणूकदार वॉरन बफेट यांनी टीका केली आहे. बफेट यांनी ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या धोरणाला एक प्रकारचे युद्ध म्हणून संबोधले आहे. ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानचे कोरडे कौतुक!
 
जगभर आर्थिक मदतीसाठी वणवण भटकणार्‍या पाकिस्तानचे कौतुक ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात केले. अमेरिकेला हवा असलेला दहशतवादी पकडण्यात अमेरिकेला सहकार्य केल्याबद्दल, पाकिस्तानच्या पदरात ट्रम्प यांच्या कौतुकाचे दोन शब्द पडले आहेत. मात्र, पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याबाबत ट्रम्प काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अमेरिकी बाजारात चिंता, तर भारतीय बाजारात चैतन्य ट्रम्प यांच्या कालच्या भाषणाचे पडसाद अमेरिकेच्या भांडवली बाजारावर उमटलेले दिसून आले. अमेरिकी भांडवली बाजाराचे सर्व निर्देशांकही नकारात्मक स्थितीत होते, तर गेले कित्येक दिवस नकारात्मक राहणार्‍या भारतीय भांडवली बाजारामध्ये मात्र बुधवारी काहीसे चैतन्य दिसून आले.