भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष
05-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( Application for Leader of Opposition by UBT ) विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अपेक्षित संख्याबळ नसतानादेखील उबाठा गटाने या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी गुहागरचे आ. भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी यासंदर्भातील शिफारसपत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा १४५ आहे, तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी २८८ जागांच्या दहा टक्के आमदार संबंधित पक्षाकडे असणे आवश्यक आहे.
२८८ च्या दहा टक्के म्हणजेच २८ आमदार ज्या पक्षाचे असतील, त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. मात्र, तसे चित्र ‘मविआ’तील तिन्ही पक्षांमध्ये दिसत नाही. विधानसभा निवडणुकीत उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गटाचे दहा आमदार निवडून आले आहेत. तिघांपैकी एकालाही विरोधी पक्षनेतेपदासाठीचा जादूई आकडा गाठता आलेला नाही. विरोधी पक्षनेतेपदाला लोकशाहीत महत्त्वाचे स्थान आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेटमंत्र्याचा दर्जा दिलेला असतो. त्यानुसार त्याला पगार, भत्ते आणि सुविधा मिळत असतात. सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम विरोधी पक्षनेता करीत असतो. विधानसभेच्या अधिवेशनात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि प्रस्तावांवर विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते.
परंतु, महाविकास आघाडीतील एकही पक्ष निकषात बसत नसताना, त्यांना हे पद द्यावे की नाही, याबाबतचा सर्वाधिकार हा विधानसभा अध्यक्षांकडे आहे. १९८६ मध्ये विरोधीतील जनता पक्षाचे २०, तर ‘शेकाप’चे १३ आमदार होते. कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नसताना, तत्कालीन काँग्रेस सरकारने जनता पक्ष आणि ‘शेकाप’कडे विरोधी पक्षनेतेपद सोपवले होते. तेव्हा जनता पक्षाचे निहाल अहमद आणि मृणाल गोरे, तर ‘शेकाप’चे दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद प्रत्येकी वर्षभरासाठी भूषवले होते.
शरद पवार गटाकडून पायात पाय
‘उबाठा’ गटाने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितल्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांच्या पायात पाय घालण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार गटाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांनीही या पदावर दावा सांगितला आहे. ते म्हणाले की, “विरोधी पक्षनेतेपद सर्व घटकपक्षांना अनुक्रमे १८ महिने मिळावे. आमचे म्हणणे आहे की, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद तीनही पक्षांना आळीपाळीने १८ महिने मिळावे. ज्यामुळे प्रत्येक पक्षाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आम्हाला एकत्र राहायचे आहे,” असेही आव्हाड म्हणाले.