झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात 'या' बापलेकांचा दमदार डान्स परफॉर्मन्स!
04-Mar-2025
Total Views |
मुंबई : सध्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात महेश आणि आदिनाथ कोठारे यांनी एकत्र उपस्थिती लावली. विशेष म्हणजे त्यांनी ‘कजरा रे’ या गाण्यावर धमाल नृत्य सादर केले. परफॉर्मन्सच्या शेवटी त्यांनी एकमेकांना मिठी मारली, आणि उपस्थित कलाकारांनी टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली. हा व्हिडीओ ‘द फिल्मी टाऊन मराठी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, आणि झी मराठी वाहिनीला टॅग करण्यात आले आहे. या कार्यक्रमात निवेदिता सराफ यांच्या कारकीर्दीचा सन्मान करण्यात आला. तसेच अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे यांसारखे नामवंत कलाकार उपस्थित होते.
महेश कोठारे यांच्या ‘माझा छकुला’ या चित्रपटात आदिनाथने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती, तर ‘झपाटलेला २’ मध्येही तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. आता ही बाप-लेकाची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांचे नाव प्रतिष्ठेने घेतले जाते. ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘धुम धडाका’, ‘माझा छकुला’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत. अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मितीतही त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे देखील अभिनय आणि दिग्दर्शनात नाव कमावत आहे. काही दिवसांपूर्वीच आदिनाथ दिग्दर्शित ‘पाणी’ या चित्रपटाचे मोठे कौतुक झाले होते.
‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याने यंदाचा सोहळा विशेष ठरला आहे. ८ मार्चला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनीही सोहळ्यात रंगत आणली. श्रेया बुगडे, ओंकार भोजने, गौरव मोरे यांनी त्यांच्या विनोदी शैलीत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.