जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अंधत्वाचे प्रमुख कारण ठरणार्या आजारांपैकी एक म्हणजे काचबिंदू (Glaucoma). हा एक डोळ्यांचा गंभीर आजार असून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. आज दि. १२ मार्च हा दिवस ‘जागतिक काचबिंदू दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ञ, ‘अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप’च्या मेडिकल डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीमधील हा अंश...
काचबिंदू म्हणजे काय? हा आजार नेमका कसा होतो? आणि याची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?
काचबिंदू हा डोळ्यांचा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा आजार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. याचा अर्थ असा की, या आजारामध्ये आपली दृष्टी कमी होत असल्याचे व्यक्तीला समजतच नाही. आपल्या डोळ्यांच्या आत सतत एक द्रव (aqueous humor) तयार होत असते आणि त्याचा निचरा होण्यासाठी एक नैसर्गिक ड्रेनेज चॅनेल असते. मात्र, जर हे चॅनेल ब्लॉक झाले किंवा द्रव बाहेर पडण्याची प्रक्रिया बिघडली, तर डोळ्यांतील दाब (Intraocular Pressure - IOP) वाढतो. सामान्यतः हा दाब दहा ते २० मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असावा. परंतु, दाब हळूहळू वाढत गेल्यास डोळ्यांच्या मागील बाजूस असलेली ऑप्टिक नर्व्ह, जी डोळ्यांना मेंदूशी जोडते ती दाबली जाते आणि हळूहळू कमजोर होऊन सुकत जाते. याचा परिणाम म्हणून, परिघीय दृष्टी (Peripheral Vision) प्रथम मंदावते आणि नंतर मध्यभागी (Central Vision) असलेली दृष्टीही कमी होऊन अखेरीस अंधत्व येते. हे अंधत्व कायमस्वरूपी असते आणि त्यामुळे दृष्टी परत आणणे शक्य नसते. विशेष म्हणजे, ९० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही ठोस लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच ‘सायलेंट किलर ऑफ ऑप्टिक नर्व्ह’ असे म्हटले जाते आणि याचा आपल्या दृष्टीवरील इतका दुष्परिणाम होतो की, शेवटच्या टप्प्यात याचे निदान होते आणि उशिरा निदान झाल्यामुळे रुग्णांची दृष्टी खूप कमी झालेली असते. त्यामुळे काचबिंदूचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लक्षणे जाणवू लागल्यानंतर साधारणतः काय काळजी घ्यायला हवी?
आधी म्हटल्याप्रमाणे ९० टक्के लोकांना काही लक्षणे जाणवत नाहीत. कारण, हे हळूहळू होत जाते. यांना वगळता, केवळ ज्या दहा टक्के लोकांमध्ये अचानक डोळ्यांतील दाब एका दिवसांत दहा मिलीमीटर ऑफ मर्क्युरीवरुन ३०च्या वर किंवा २० मिलीमीटर ऑफ मर्क्युरीवरुन सरळ ५० वर गेला असेल, अशा रुग्णांमध्ये डोकेदुखी, डोळे दुखणे, लालसरपणा, अंधुक दृष्टी ही अशी लक्षणे आढळून येतात. पण ज्यांना जाणवत नाही, त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्यांनी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा आजार आहे की नाही, हे आपल्याला समजू शकेल.
काचबिंदूची प्रमुख कारणे काय आहेत? आणि अनुवंशिकतेचा या आजाराशी थेट संबंध आहे का?
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याचे कोणतेही ठोस एकच कारण नसले, तरी यात काही जोखमीच्या बाबी (Risk Factors) आहेत, ज्या समजून घेणे महत्त्वाचे आहे. जसे की चाळिशीनंतर काचबिंदू होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे नियमित डोळ्यांची तपासणी आवश्यक आहे. अनुवंशिकतेचा विचार केल्यास ‘First degree relatives’ म्हणजे आईवडील किंवा बहीण-भाऊ यांपैकी कोणालाही काचबिंदू असेल, तर ‘First degree relatives’ ना काचबिंदू होण्याचे प्रमाण तीन ते नऊच्या पटीने अधिक असते. त्यामुळे या आजाराची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी सहा महिन्यांतून एकदा तरी डोळ्यांची तपासणी करावी. इतर काही कारणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. डोळ्यांना झालेली दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाल्यासही काचबिंदू उद्भवू शकतो. तसेच दीर्घकाळ स्टेरॉईड्सचा वापर (इन्हेलेशन, गोळ्या, इंजेक्शन्स) केल्यास डोळ्यांवर परिणाम होऊन हा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे.
या आजारासाठी कोणत्या उपचारपद्धती आहेत? आणि एकदा झालेला काचबिंदू पूर्णपणे बरा होतो का?
उपचारपद्धती जाणून घेण्यापूर्वी या आजाराचे निदान कसे होते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एक नेत्ररोगतज्ञ म्हणून विशेषतः ‘अनिल आय हॅास्पिटल’चा एक महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे, ज्यामध्ये कुठल्या डोळ्यांच्या रुग्णाला फक्त डोळ्यांचा नंबर तपासण्यापुरते नव्हे, तर डोळ्यांच्या आतील रचनेविषयी सखोल माहिती दिली जाते आणि तपासणीदेखील केली जाते, जेणेकरून रुग्णाला लक्षणे जाणवत नसली, तरी सखोल तपासणी करून सांगू शकतो, काय त्रास आहे किंवा काचबिंदू होण्याची शक्यता आहे. जर काचबिंदू होण्याची शक्यता वाटली, तर अशा रुग्णाला ‘स्पेशलाईज्ड ग्लूकोमा वर्कअप टेस्ट’ (a specialised glaucoma workup test) करण्यास सांगतो. या आजारामध्ये अचूक निदान होणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे निदान या चाचणीमधून होते. यामध्ये ‘टोनोमेट्री’ (tonometry), ‘ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी’ (Optical coherence tomography - OCT), ‘पेरिमेट्री’ (Perimetry) यांचा समावेश असतो. या चाचण्यांद्वारे दृष्टीवर झालेल्या परिणामाचे अचूक निदान होते. उपचारपद्धतीमध्ये सुरुवातीला आयड्रॉप्स दिले जातात, जे डोळ्यांचा दाब नियंत्रित ठेवतात. जर औषधांनी नियंत्रण शक्य नसेल, तर लेझर उपचार किंवा शस्त्रक्रिया केली जाते.
काचबिंदू हा आजार फारसा लोकांना माहीत नाही. त्या तुलनेत मोतीबिंदूविषयी बर्यापैकी माहिती असते. तर या दोन आजारांमध्ये नेमका काय फरक आहे?
काचबिंदू आणि मोतीबिंदू या दोन्ही शब्दांच्या रचनेत साम्य असल्याने हे आजार समजून घेण्यात खूप लोकांचा गोंधळ होतो. आपल्या डोळ्यांच्या आत जी पारदर्शक लेन्स असते, ती स्पष्ट असायला हवी. ती जेव्हा पांढरी होते, धूसर होते, त्यामुळे दृष्टी कमी होत जाते. याला मोतीबिंदू म्हणतात. मोतीबिंदूचे निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढून नवीन लेन्स बसवता येते. यामुळे १०० टक्के दृष्टी पुन्हा मिळवता येते. परंतु, काचबिंदू हा पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये डोळ्यांतील दाब वाढून ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते. यामुळे हळूहळू तुमची दृष्टी कमी होत जाते आणि कायमस्वरुपी अंधत्व येते.
दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ साजरा केला जातो. यामागील उद्देश काय आहे? त्यानिमित्त आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून आपण कोणते उपक्रम राबवता?
‘जागतिक काचबिंदू सप्ताहा’च्या (World Glaucoma Week) निमित्ताने स्थानिक पातळीपासून ते सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काचबिंदू आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात, जेणेकरून या आजाराला कुणीही बळी पडू नये आणि डोळ्यांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित होईल. याकरिता हा ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ साजरा केला जातो. यानिमित्ताने आमच्या ‘अनिल आय हॉस्पिटल’च्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहितीपूर्ण चर्चासत्रे आणि वेबिनार्स आयोजित केले जातात. रुग्णांना सखोल माहिती देण्यासाठी स्थानिक पातळीवर शोभायात्रांचे आयोजन केले जाते. तसेच डिजिटल पोर्टलद्वारे माहितीच्या लिंक्स पाठवल्या जातात. रुग्णालयामध्ये माहितीपत्रके आणि तक्ते लावण्यात येतात. यापुढेही ‘महाराष्ट्र ऑप्थलमोलॉजिकल सोसायटी’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या आजाराविषयी समाजात जागरुकता निर्माण व्हावी, याकरिता नवनवीन उपक्रम राबवण्याचे योजिले आहे.
अनिशा डुंबरे
(अधिक माहितीसाठी संपर्क - अनिल आय हॉस्पिटल, डोंबिवली संपर्क क्र. - ९७६९४८३७९६)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\