सकाळी ९ च्या भोंग्याचे काय करायचे? मुख्यमंत्री फडणवीसांचा सभागृहात खोचक टोला
11-Mar-2025
Total Views |
मुंबई : मशीदीवरील भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी ९ च्या भोंग्याचे काय करायचे? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव न घेता सभागृहात उपस्थित केला.
मंगळवार, ११ मार्च रोजी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मशीदीवरील भोंग्यांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळच्या ९ च्या भोंग्याचे काय करायचे? असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला.
मशीदींवरील भोंग्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यांचा आवाज नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर सोपवली. "ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून या आदेशानुसार कारवाया करण्यात येत आहेत. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ डेसीबल व रात्री ४५ डेसीबल आवाजाची मर्यादा आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) वापर करण्यास बंदी असल्यामुळे विहित वेळेत भोंगा बंद न केल्यास आणि तक्रारी प्राप्त झाल्यास ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम, २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच पोलीस विभागामार्फत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. यापुढे ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास विनाविलंब तात्काळ कारवाई करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.