नाथ संप्रदायाची परंपरा ही देशातील सर्वात मोठी परंपरा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे भूमिपूजन
05-Feb-2025
Total Views |
बीड : नाथ संप्रदायाची परंपरा ही देशातील सर्वात मोठी परंपरा मानली जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे भूमिपूजन पार पडले. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "श्री दत्त भगवानांच्या आशीर्वादाने नाथ संप्रदायाची परंपरा ही देशातील सर्वात मोठी परंपरा मानली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी नाथ संप्रदायाचा अवलंब करणारे आणि कठीण जीवन जगणारे अनेक साधू, संत, महंत आणि पाहायला मिळतात. आम्हाला वर्षानुवर्षे भक्तीचा मार्ग आणि त्यातून मुक्तीचा मार्ग आमच्या नाथांनी दाखवला. मच्छिंद्रनाथांबद्दल सर्वांना कल्पना आहेच. त्यांच्या स्थळी येण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. मच्छिंद्रनाथांचा आशीर्वाद घेतल्याने पुढच्या जीवनात माझ्या हातून निश्चितपणे चांगले काम होईल."
"सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अजून काही काम करायचे आहे. मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. नारायणगडाचा दुसऱ्या टप्प्याचे कामसुद्धा लवकरात लवकर हातात घेऊन त्याला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ. कानिफनाथ मंदिरापासून तर मच्छिंद्रनाथ मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हातात घेऊ. यासोबतच मच्छिंद्रनाथ मंदिरापासून तर कानिफनाथ मंदिरापर्यंत रोप वे करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे. रोप वे संदर्भातील काम नितीन गडकरी साहेबांकडे आहे. आपण त्यांच्याकडे जाऊन या रोपवेबद्दल सांगू," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "आपला देश हा भक्तांचा देश आहे. कुंभमेळ्यात जवळपास ४५ कोटी लोक गंगास्नान करत आहेत. अख्ख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आणि अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दीडपट लोक प्रयागराजला कुंभमेळ्यात गंगास्नान करत आहेत. हा देश भाविकांचा देश आहे. त्यामुळेच इतकी आक्रमणे होऊनही आमच्या भक्तीमार्गामुळे संस्कृती आणि संस्कार जिवंत राहिले. वारकरी सांप्रदायासह वेगवेगळ्या पंथांनी या देशाच्या विचाराला जिवंत ठेवलं आणि आम्हीला अश्रद्ध होऊ न देता सश्रद्ध ठेवले," असेही ते म्हणाले.