कंगना राणावत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन
07-Jan-2025
Total Views |
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत दिग्दर्शित आणि अभिनित आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ अनेक अडचणींचा सामना करुन अखेर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या चित्रपटाशी संबंधित एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यात कंगना राणावत कशा प्रकारे प्रोस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसू लागतात हे दिसते.
अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कंगना मेकअप करताना दिसत आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कंगना भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्यांचा लूक प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
अनुपम खेर यांनी कंगना राणावतच हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, “शानदार! कंगना राणावत बनल्या भारताच्या सर्वात ताकदवान महिला – इंदिरा गांधी! ऑस्कर विजेते प्रोस्थेटिक आणि मेकअप आर्टिस्ट डीजे मालिनोव्स्की यांच्या कलेमुळे झालेला हा अद्भुत बदल नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.” हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
अनुपम खेर यांनी पुढे लिहिलं आहे की, “कंगना राणावत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वांत काळ्या पर्वात घेऊन जातो.” कंगना राणावत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक यांसारखे कलाकार देखील झळकणार आहेत.