2025 वर्ष : विकसित महामुंबईची रुपरेषा

Total Views |
 
Mumbai
 
मुंबई महानगर प्रदेश अर्थात महामुंबईसाठी 2025 हे वर्ष विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार आल्याने आता आगामी काळात महामुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळाली आहे. त्यानिमित्ताने वर्ष 2025 मध्ये पूर्ण होणार्‍या प्रकल्पांचा संक्षिप्त आढावा घेणारा हा लेख...
 
महामुंबईकरांसाठी 2025 हे वर्ष सर्वार्थाने खास असणार आहे. वाहतूककोंडीतून मुक्त होत, वेळेत बचत करणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प महामुंबईकरांसाठी यंदा खुले होतील. यामध्ये नवी मुंबई विमानतळ, नवा वाशी खाडी पूल, ‘मेट्रो 3’चा दुसरा टप्पा आणि मुंबई-पुणे प्रवासासाठी मिसिंग लिंक हे चार नवे प्रकल्प नव्या वर्षात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. शिवाय, मेट्रोच्या कामांनाही गती देण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
 
रस्ते कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आज मुंबई महानगरात अनेक गृहनिर्माण प्रकल्पांनाही वेग आला आहे. अशा वेळी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून उपनगरीय रेल्वे सेवा सुधारण्यावरही प्रकर्षाने भर दिलेला दिसतो. ‘अमृत भारत’ स्थानकांतर्गत पुनर्विकासासोबतच उपनगरीय रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणालाही वेग आला आहे. याचसोबत मुंबईतील जुन्या चाळी आणि पुनर्विकास प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर असून, वरळी बीडीडी चाळीसारखा मुंबईकर आणि मराठी माणसाला हक्काचे घर देणार्‍या पुनर्विकास प्रकल्पातील पहिले घरदेखील याच वर्ष 2025 मध्ये मिळेल, अशी आशा आहे.
 
मेट्रो प्रकल्प
 
सन 2024 मध्ये राज्य सरकारने मेट्रो मार्गांचा विस्तार केला आहे. त्यामुळे नागरिकांना ‘एमएमआर’मध्ये कोणत्याही भागात प्रवास करता येणार आहे. हे ‘मेट्रो’ मार्गानी केवळ कनेक्टिव्हिटी सुधारत नाहीत, तर पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ आणि कार्यक्षम वाहतूक पद्धतीला प्रोत्साहन देतात.
 
मेट्रो लाईन 3 (बीकेसी - कुलाबा)
 
बीकेसी ते कुलाबा या भूमिगत ‘मेट्रो-3’चा शेवटचा टप्पा मे 2025 मध्ये सुरू होईल, या मार्गाचा पहिला टप्पा निवडणुकीपूर्वी जनतेसाठी खुला करण्यात आला होता. सध्या आरे ते बीकेसी दरम्यान दररोज सुमारे 21 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. संपूर्ण लाईन तयार झाल्यानंतर प्रवाशांची संख्या आणखी वाढेल.
 
मेट्रो 9 (दहिसर पूर्व - मीरा भाईंदर)
 
‘मेट्रो लाईन 9’च्या पहिल्या टप्प्याचे (दहिसर ते काशीगाव) काम वेगाने सुरू आहे. मार्च 2025 मध्ये ही मार्गिका मुंबईकरांसाठी खुली होईल, असा अंदाज आहे. या टप्प्यात चार स्थानकांचा समावेश आहे, ज्यामुळे पश्चिम उपनगरातील मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल.
 
सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड विस्तार
 
हा प्रकल्प मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत नियोजित केलेला असून, हा प्रकल्प ‘बीकेसी’ला पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड हा ‘बीकेसी’ला पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा एक उड्डाणपूल आहे. या प्रकल्पाचे सुमारे 95 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित कामकाज प्रगतिपथावर आहे.
 
नवी मुंबई विमानतळ
 
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सध्या वेग आला आहे. नुकतीच याठिकाणी व्यावसायिक विमानाची पहिली चाचणी संपन्न झाली. हे भारतातील पहिले इंटिग्रेटेड सुविधा असणारे विमानतळ असेल. या विमानतळाकडे पोहोचण्यासाठी जवळपास प्रत्येक प्रकारातील वाहतूक सुविधा उपलब्ध असतील, ज्यामध्ये प्रवासी मेट्रो, बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे आणि अटल सेतूच्या माध्यमातून पोहोचू शकतील.
 
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा
 
‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ (चडठऊउ) फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये समृद्धी महामार्गचा शेवटचा 76 किमी लांबीचा भाग जनतेसाठी खुला करणार आहे. हा भाग ठाण्यातील आमणे ते इगतपुरी असा आहे.
 
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प
 
‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’द्वारे बांधण्यात येत असलेला मिसिंग लिंक प्रकल्प मे 2025 पर्यंत सुरू होण्याचा अंदाज आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा एक भाग आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ अनेकदा तासन्तास वाहतूककोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी आणि मुंबई-पुणे प्रवासाची गती वाढविण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार्‍याचा वेळ 45 मिनिटांनी वाचणार आहे.
 
नवीन वाशी खाडी पूल
 
नवीन वाशी खाडी पूल फेब्रुवारी 2025 मध्ये पूर्णपणे खुला होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, नवीन टोल बुथ आणि प्रशासकीय इमारतीचे कामही पूर्ण झाले आहे. याशिवाय, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पॅचवर्कचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाचे लोकार्पण होईल.
 
शिवडी-वरळी जोडरस्ता
 
शिवडी-मुंबई आणि नवी मुंबईसह रायगडला जोडण्यात अटल सेतू महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्रकल्पांतर्गतच शिवडी-वरळी जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत 60 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत हा जोडरस्ता खुला करण्यात येईल, असा अंदाज वर्तविला आहे.
 
मुंबईकरांची हक्काची घरे
 
बीडीडी पुनर्विकासातील पहिले घर मिळणार
 
‘म्हाडा’कडून डिलाईल रोड, दादर आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाला वेग आला आहे. प्रकल्पाची गती पाहता, ‘म्हाडा’ मार्च 2025 मध्ये या प्रकल्पातील पहिले घर देईल, असा अंदाज आहे. वरळीत या प्रकल्पांच्या इमारती दिमाखात उभ्या राहिल्या आहेत. या पुनर्विकासात पात्र नागरिकांना 500 चौ. फुटांची घरे मिळणार आहेत. यासोबतच बीडीडीच्या इतर प्रकल्पांनाही गती मिळणार आहे.
 
धारावी पुनर्विकास : सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार
 
धारावी पुनर्विकासाला गती मिळाली आहे. सर्वेक्षणाचे काम 2025 मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतरच पात्र-अपात्रेचा निर्णय घेतला जाईल. धारावीला जागतिक दर्जाच्या शहरात रुपांतरित करण्यासाठी प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.
 
अभ्युदय नगर पुनर्विकास
 
अभ्युदय नगर (काळाचौकी) पुनर्विकासासाठी दि. 30 डिसेंबर रोजी निविदा काढण्यात आली आहे. सध्या अभ्युदय नगरमध्ये 1 लाख, 33 हजार, 593 चौ.मी.च्या भूखंडावर 48 इमारती आणि 3 हजार, 410 फ्लॅट्स बांधण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाचा सुमारे 15 हजार रहिवाशांना फायदा होणार आहे. या इमारतींच्या विकासाची जबाबदारी ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाकडे सोपवण्यात आली आहे. अभ्युदय नगर कॉलनीची पुनर्विकास प्रक्रिया ‘सी’ आणि ‘डी’ मॉडेलनुसार विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना
 
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील योजना ’एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’ यांच्या संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प 48 महिन्यांत राबविण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत पात्र झोपडपट्टीधारकांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बगीचे, आरोग्य केंद्रे आणि शैक्षणिक सुविधा यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधादेखील विकसित करण्यात येणार आहेत.
 
रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणा
 
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्याचा विस्तार करण्यासाठी मुंबई उपनगरात 12 रेल्वे प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे, ज्यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरमध्ये 301 किमीचे रेल्वे नेटवर्क तयार केले जात आहे. यांपैकी बरेच प्रकल्प आगामी एक ते पाच वर्षांत पूर्ण होतील, ज्यामुळे उपनगरीय लोकल तसेच मेल-एक्सप्रेसची संख्या वाढेल. यामुळे मुंबई महानगरातून प्रवास करणार्‍या लाखो मुंबईकरांना फायदा होईल. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या पनवेल, बदलापूर, कर्जत, उरण, विरार या भागांत मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे बांधली जात आहेत. त्यामुळे या भागातून प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत आहे. भविष्यात प्रवाशांच्या या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी रेल्वेने उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या विस्तारावर भर दिला आहे.
 
मध्य रेल्वे मार्गावरील प्रकल्प
 
- छशिमट-कुर्ला 5वी-6वी मार्गिका -पूर्णत्वाचा कालावधी : डिसेंबर 2025
- फेज ख : परळ-कुर्ला (10.1 किमी) पूर्ण - दुसरा टप्पा : परळ-छशिमट (7.4 किमी) प्रगतिपथावर
- पनवेल-कर्जत दुहेरीकरण - पूर्णत्वाचा कालावधी : डिसेंबर 2025
- ऐरोली-कळवा उन्नत मार्ग - पूर्णत्वाचा अंदाजित कालावधी : डिसेंबर 2025
- कल्याण-आसनगाव चौथी मार्गिक - पूर्णत्वाचा अंदाजित कालावधी : डिसेंबर 2025
- कल्याण-बदलापूर 3री-4थी मार्गिका - पूर्णत्वाचा अंदाजित कालावधी : डिसेंबर 2025
 
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रकल्प
 
 मुंबई सेंट्रल - बोरिवली 6वी लाईन
सद्यस्थिती : खार-गोरेगाव (8.9 किमी, गोरेगाव-बोरिवली (8.2 किमी) - पूर्णत्वाचा अंदाजित कालावधी : मार्च 2025
 
 
 
Developed Mumbai

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.