पुणे (प्रतिनिधी) : (Sarsanghachalak Pune News) "परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसूसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे", असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. शास्त्रांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नसतानाही भेदाभेद अमंगळ कशासाठी, असा प्रश्नही सरसंघचालकांनी यावेळी उपस्थित केला.
बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि श्री सदगुरू ग्रुप, पुणे तर्फे आयोजित वेदसेवक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, न्यासाचे महासचिव चंपतराय बन्सल, भारत विकास ग्रुपचे संस्थापक डॉ. हणमंतराव गायकवाड, अभिजीत पवार, सद्गुरू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, "या आधी अमेरिका, पोलंड आणि अरब राष्ट्रांनी हे अनुभवले आहे. समाजात कलहाची आग लावून, स्वार्थाची पोळी भाजण्याऱ्या मधांद शक्ती भारतात आल्या असून, आपल्या ज्ञानातूनच त्याची उत्तरक्रिया करावी लागेल. त्यासाठी आपले स्वचे ज्ञान जागृत करत, परंपरेचे आणि संविधानाचे अनुशासन पाळले पाहीजे."
यशवंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,"राममंदिर पुनर्निर्माणासाठी चारही वेदांचे अनुष्ठान करण्यात आले. येत्या काळात वेदपाठशाळा आणि शैक्षणिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरु होणार आहे." अभिजित पवार यांनी अध्यात्म आणि विज्ञानाच्या अनुभूतीच्या जोरावर सांगड मांडली. तसेच रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यात सहभागी २४० पुरोहितांना प्रत्येकी एक लाखाची दक्षिणा जाहीर केली. तळागाळातील नागरिकांसाठी भारत विकास ग्रुपची स्थापना आणि वाटचाल हा प्रवास यावेळी हणमंतराव गायकवाड यांनी उलगडला. कार्यक्रमात 'संकल्प ते सिद्धी' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संजय उपाध्ये यांनी केले.
पसायदान हा रामराज्याचा जाहीरनामा
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, "लालसेपोटी कर्मकांडे किंवा अनुष्ठाने केली जातात, असा समज आहे. पण तुम्ही तो मोडीत काढला. भगवंताच्या भजनाबरोबरच समाजाच्या सेवेचे कार्य आणि सज्जनांचे संघठन करणे आवश्यक आहे. काहीही न घेता समाजाकरता, राष्ट्रासाठी झटणे आणि देशासाठी अर्पण करणे हे मुख्य ब्राह्मण्यत्व आहे. समाज घडविण्याचे कार्य त्यांनी करावे. श्रीरामाची स्थापना झाली मात्र रामराज्याची स्थापना अजून व्हायची आहे. रामराज्याशिवाय सगळीकडे सूख नांदणार आहे. माऊलींचे पसायदान हा रामराज्याचा जाहीरनामा आहे."
अयोध्येत निषादराज आणि शबरीचे मंदिर
अयोध्येतील श्रीराम मंदिर परिसरात श्रीरामांच्या समकालीन ऋषी आणि संतांचे १८ मंदिरे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती चंपतराय यांनी दिली. श्रीरामलल्लाचे पाच वर्षाचे वय आणि ५१ इंचाच्या मुर्ती मागील विज्ञान त्यांनी उलगडले. अयोध्यातील मंदिर बांधकामाची सद्यस्थिती आणि भविष्यातील कामांची माहिती त्यांनी दिली. चंपतराय म्हणाले, "महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, अगस्ती ऋषी यांसह निषादराज, शबरीमाता, अहिल्या, जटायू आणि तुलसीदासांचे मंदिर निर्माण होणार आहे. सध्या मंदिर परिसरात दहा हजार नागरिकांची व्यवस्था आहे. पुढील दोन वर्षानंतर २५ हजार भाविकांची व्यवस्था होईल. तसेच पर्यावरणपूरक आणि झिरो डिस्चार्जची व्यवस्था मंदिर परिसरात असेल."असेही ते म्हणाले.