नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृत दौऱ्यादरम्यान मंगळवारी सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून बंदर सेरी बेगवान येथे दाखल झाले. ब्रुनेईला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. भारत आणि ब्रुनेई दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याच्या ४०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत पंतप्रधानांची ही ऐतिहासिक भेट आहे.
बंदर सेरी बेगवान येथे पोहोचल्यावर, ब्रुनेई इथल्या पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले आणि ब्रुनेईचे राजपुत्र हाजी अल-मुहतादी बिल्लाह, युवराज आणि वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.
ब्रुनेई हा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरण आणि हिंद-प्रशांत दृष्टिकोनातील महत्त्वाचा भागीदार आहे. भारत आणि ब्रुनेई यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत जे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर परस्पर आदर आणि सामंजस्य यांचे द्योतक आहेत. उभय देश इतिहास, संस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरेने जोडलेले आहेत.