रघुकुलतिलक श्रीरामाचे सकल मराठी संतांनी गुणसंकीर्तन केले असले, तरी श्रीरामकथेवर मराठीत स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे पहिले संत एकनाथ आहेत. त्यानंतर समर्थ रामदासस्वामी आणि तिसरे संतकवी श्रीधर (नाझरेकर) आहेत. संतकवी श्रीधर यांनी १७०३ साली श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ‘रामविजय’ लिहिला. ४० अध्यायी ९ हजार, १४७ ओव्यांचा ‘रामविजय’ महाराष्ट्राच्या ग्रामीण भाविकातील सर्वाधिक लोकप्रिय पारायण ग्रंथ आहे. ‘रामविजय’ एवढी अफाट स्वीकृती लोकप्रियता महाराष्ट्रात अन्य कोणत्याही ग्रंथास लाभलेली नाही. आजही गावांगावांमध्ये ‘रामायण’ पारायण सप्ताह सोहळ्याचे भव्य दिव्य वार्षिक आयोजन होते व सारा गाव रामभक्तीमय होतो. ‘रामविजय’ मधील रामाचे आपण सलग दोन लेखात शब्दावलोकन करूयात.
’रामविजय’ ग्रंथ सुंदर। भक्तिज्ञान वैराग्य भांडार॥
ग्रंथनाम रामविजय। श्रवणे सदा पाविजे जय।
चिंतित मनोरथ सिद्ध होय। एक आवर्तन करिताचि॥
श्री ’रामविजय’ हा संतकवी श्रीधरस्वामींचा दुसरा ग्रंथ. ‘हरिविजय’ नंतर केवळ आठ महिन्यांनी ’रामविजय’ वाचकांना मिळाला. ’हरिविजय’ शके १६२४ सालच्या मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण झाला, तर रामविजय शके १६२५ (इ.स. १७०३) मध्ये श्रावण महिन्यात भानुसप्तमीला पूर्ण झाला. शके १६२५। सुभानुनाम संवत्सरास ॥ भानुसप्तमी शुद्ध विशेष । श्रावण मास विख्यात पै ॥ हा ग्रंथही श्रीधरांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथेच लिहिलेला आहे. त्याचाही स्पष्टपणे निर्देश श्रीधरांनी केलेला आहे.
पंढरीक्षेत्री निश्चेसी।
रामविजय संपविला ते दिवशी॥ रामविजय ४०/२०६
त्यामुळे ’रामविजय’ केव्हा व कोठे लिहिला, याविषयी अभ्यासकांत मतभेद नाहीत. नित्यनेमाची पूजाअर्चा, स्वाध्याय आणि प्रवचन, कीर्तन, पुराणाचे नैमित्तिक कार्यक्रम पार पाडत, केवळ आठ महिन्यांत श्रीधरांनी ४० अध्यायी, ९ हजार, १४७ ओव्यांचा ’रामविजय’ लिहून पूर्ण करावा, ही गोष्ट श्रीधरांच्या प्रज्ञा व प्रतिभेचेच तसेच, समर्पित भाव व ध्यास या श्रीधरगुणसंपदेचे दर्शन होते.
अफाट लोकप्रिय संतकवी
संतकवी ’श्रीधर’ म्हणून सुविख्यात अशा या कवीचे पूर्ण नाव श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर असे असून, इ.स. १६५८ ते १७३० असा त्यांचा कार्यकाळ आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे त्यांचे वास्तव्य होते. पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिरावर कुंभारघाट येथे त्यांची समाधी आहे. ’हरिविजय’, ‘पांडवप्रताप’ आणि महिलावर्गात अफाट लोकप्रिय ’शिवलीलामृत’ या ग्रंथाचे लेखक असलेले संतकवी श्रीधर यांचा छ. शाहू महाराज यांनी सातारा दरबारात सत्कार करून एक गाव इनाम दिला होता. ’महाराष्ट्र सारस्वत’ कार वि. ल. भावे संतकवी श्रीधरांच्या गौरवपूर्ण योगदानाचा उल्लेख करून म्हणतात की, ’श्रीधरांची अफाट लोकप्रियता सर्वांनाच थक्क करणारी आहे.’
भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अवतारी महापुरुष भारतीयांचे पूजनीय मानबिंदू आहेत. भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाचे व भारतीय एकात्मतेचे हे मुख्य स्तंभ आहेत. श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या दिव्य कथांनी व या कथांनी दिलेल्या मूल्याच्या उभ्या आडव्या धाग्यांनी राष्ट्रीय महावस्त्र विणलेले आहे. विठ्ठलोपासक वारकरी संप्रदायाचा मुख्य नाममंत्र ’राम कृष्ण हरी’ या पूर्वापार भावसंस्काराचाच एक आविष्कार आहे. हा ’राम कृष्ण हरी’ मंत्र वारकरी संप्रदायाचे उपासनेचे मुख्य अधिष्ठान आहे. या मंत्रापैकी श्रीकृष्णाच्या जीवन लीलांवर ’हरिविजय’ लिहिल्यानंतर पुढे श्रीरामचंद्रांच्या कथांवर श्रीधरांकडून ग्रंथलेखन हे सहज स्वाभाविकच होते. श्रीकृष्णकथापर ग्रंथास ’हरिविजय’ नाव दिल्यानंतर रामकथापर ग्रंथास ’रामविजय’ हे नाव सुद्धा स्वाभाविक आहे. या ग्रंथनामाबद्दल श्रीधर म्हणतात-
’नित्य विजयी रघुनंदन।’ अशा विजयी श्रीरामाचे गुणचिंतन-वाचन-पठण करण्याने श्रोते-वाचकही आपल्या जीवनात नित्य विजयी होतील, असा विश्वास श्रीधरांनी केलेला आहे.
संत एकनाथ महाराज आणि समर्थ रामदासस्वामी या दोन पूर्वसुरींबद्दल आदरभाव ठेवूनच श्रीधरांनी आपल्या शैलीनुसार रामकथांचे नव्याने रंजकपणे कथन केले. वाल्मिकी ऋषींच्या मूळ रामायणाप्रमाणेच श्रीधरकृत ’रामविजय’ ग्रंथातही सात कांडाची रचना आहे. त्याचा तपशिल प्रथम कांड: बालकांड. यावर श्रीधरांनी आठ अध्याय लिहिले आहेत. द्वितीय: अयोध्या कांडावर चार अध्याय; तृतीय: अरण्यकांड चार अध्याय; चतुर्थ: किष्किंधा कांड दोन अध्याय, पंचम: सुंदरकांड- पाच अध्याय, तर सहाव्या: युद्ध कांडावर श्रीधरांनी चक्क दहा उत्तरकांडावर सात अध्याय रचले आहेत. अशाप्रकारे ’श्रीधरकृत’ ’रामविजय’ ग्रंथात एकूण ४० अध्याय आहेत व एकूण ओवी संख्या ९ हजार, १४७ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीपेक्षा सुमारे एक हजार ओव्या अधिक आहेत.
श्रीधरांनी ‘रामविजय’ लिहिण्यापूर्वी वाल्मिकी ’रामायण’, ’हनुमान्नाटक’ या शिवाय अन्य १९ रामायणांचा अभ्यास संदर्भ म्हणून केलेला आहे. त्या सर्व रामायणांची नावेही श्रीधरांनी दिलेली आहेत. ती अशी- १) वसिष्ठ रामायण २) शुक रामायण ३) मारुतीचे नाटक- रामायण ४) बिभिषण रामायण ५) ब्रह्म रामायण ६) शिव रामायण ७) अगस्ती रामायण ८) शेष रामायण ९ ) अध्यात्म रामायण १०) शैव रामायण ११) आगम रामायण १२) कूर्म रामायण १३) स्कंद रामायण १४) पौलस्ती रामायण १५) अरूण रामायण १६) पद्म रामायण १७) भरत रामायण १८) धर्म रामायण १९) आश्चर्य रामायण. श्रीधरांनी लेखनास मुख्य आधार वाल्मिकी रामायणच मानलेले आहे, असे त्याने स्पष्टपणे कथन केले आहे.
मूळापासून इतक्या कथा। कैशा वर्णवतील तत्त्वता।
त्यामाजी वाल्मिकी नाटक थोर ग्रंथा। रामविजया लागूनी कथू॥
‘रामविजय’ मधील प्रत्येक अध्यायाशेवटी ’समंत वाल्मिक नाटकाधार’ असा स्पष्ट निर्देश श्रीधरांनी केलेला आहे. आपला ’रामविजय’ ग्रंथ वाचक- श्रोत्यांना अधिक संतोष देणारा ठरावा म्हणून श्रीधरांनी अनेक रामायणातून काही रामकथांचा स्वीकार केला आहे. रामकथार्णवाचे मंथन करून श्रीधरांनी आकर्षक व रंजकपणे लिहिता येईल, अशाच कथा वाचकांना डोळ्यापुढे ठेऊन निवडल्या आहेत. त्या कथांतून अपेक्षित असा बोध करण्याचा दृष्टिकोनही श्रीधरांनी ठेवलेला दिसतो.