‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात जगाचा चालक होण्याची मोठी संधी भारताला मिळाली आहे. संगणक क्रांतीनंतर तशी संधी मिळाली होती आणि भारतीयांनी तिचा पुरेपूर लाभ घेतला. आताही शाश्वत विकासाचा नवा मार्ग ‘एआय’ तंत्रज्ञानाने दाखवून दिला आहे. याचा दुरुपयोग टाळला, तर हे तंत्रज्ञान कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही प्रदान करणारे आहे.
आय’शी संबंधित उत्पादनांची जागतिक बाजारपेठ वाढत असून, २०२७ मध्ये ती ९९० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’शी संबंधित सेवा तसेच, हार्डवेअरसह ही बाजारपेठ गेल्या वर्षीच्या १८५ अब्ज डॉलर्सवरून वार्षिक ४० ते ५५ टक्क्यांनी वाढेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे ७८० ते ९९० अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळेल, असे हा अहवाल सांगतो. कार्यक्षमता वाढविण्यासाठी दिग्गज कंपन्या तसेच, सरकारद्वारे चालविल्या जाणार्या ‘एआय’ प्रणाली आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी डेटा सेंटर्सद्वारे त्यांच्या वाढीस चालना दिली जाईल. या तंत्रज्ञानाची मागणी वेगाने वाढत असल्याने, हे तंत्रज्ञान पुरविण्यासाठी आवश्यक त्या घटकांच्या पुरवठा साखळीवर त्यामुळे ताण येईल. भूराजकीय तणावाबरोबरच वाढत्या विक्रीमुळे सेमीकंडक्टर, पर्सनल कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.
‘एआय’ बद्दल अनेक समज-गैरसमज असल्याने, ‘एआय’ म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. या तंत्रज्ञानाची विस्तारित क्षमता हीच एक मोठी संधी आहे. ‘जनरेटिव्ह एआय’, विशेषत: ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ (एलएलएम) यांनी अलीकडच्या काळात उल्लेखनीय प्रगती केली आहे. अगदी संगणक प्रणालीसाठी काम करणे असेल, वा प्रतिमानिर्मिती प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढला आहे. ‘मशीन लर्निंग’ अल्गोरिदममध्ये सुरू असलेली प्रगती, सुधारित संगणकीय शक्ती आणि मोठ्या प्रमाणात डेटासेटची उपलब्धता या वाढीमध्ये योगदान देत आहे. यात होत असलेल्या सुधारणा अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि नाविन्यपूर्ण अॅप्लिकेशन उपलब्ध करून देत आहेत. ‘एआय’च्या क्षमतांमध्ये करण्यात येत असलेली वाढ यासाठीही मोठे मनुष्यबळ कार्यरत आहे. विविध क्षेत्रांतील ‘एआय’चा वाढता वापर हा या बाजाराच्या वाढीला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. ‘एआय’चा वापर मानवी क्षमतांना वाढवणारा ठरत आहे. व्यवस्थापन, विपणन, ग्राहकसेवा या क्षेत्रात हे विशेषत्वाने पाहता येईल. ‘एआय’चा वापर करताना, डेटा गोपनीयता, रोजगार कमी होण्याची भीती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर यांचाही विचार करावा लागेल. त्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्या लागतील. या तंत्रज्ञानाकडे पाठ करणे योग्य ठरणार नाही. या क्षेत्राच्या वाढीसाठी कुशल मनुष्यबळ कमी पडत आहे.
तंत्रज्ञानातील प्रगती, यात होत असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याचा होत असलेला वापर यामुळे ‘एआय’ची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. २०२७ पर्यंत ती सुमारे एक ट्रिलियन डॉलर्सची होईल, असा अंदाज म्हणूनच बांधला जात आहे. आरोग्य सेवा, वित्त क्षेत्र, उत्पादन क्षेत्रात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचवेळी ‘एआय’ तंत्रज्ञान प्रगत कसे होईल, याकडेही लक्ष देण्यात येत आहे. ‘जनरेटिव्ह एआय’, ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी)’, आणि ‘कॉम्प्युटर व्हिजन’ सारख्या नवकल्पनांनी ‘एआय’ प्रणाली अधिक सुलभ आणि प्रभावी बनवली आहे. ‘क्लाऊड कंम्प्युटिंग’च्या वाढीमुळे त्याचा लाभ घेणे सोयीचे ठरत आहे. दिग्गज टेक कंपन्या म्हणूनच यातील नवोद्योगांना आर्थिक बळ देत आहेत. त्याचवेळी प्रस्थापित कंपन्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी यात मोठी गुंतवणूक करत आहेत. अनेक देशांनी याचे धोरणात्मक महत्त्व ओळखत, नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी तसेच, स्पर्धात्मकता राखण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात ‘एआय’ने रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या, असे निश्चितपणे म्हणता येते.‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या अहवालात असे नमूद करण्यात आले होते की, ‘एआय’ २०२५ पर्यंत जागतिक स्तरावर सुमारे ८५ दशलक्ष रोजगार विस्थापित करेल. मात्र, त्याचवेळी हे तंत्रज्ञान ९७ दशलक्ष नवीन रोजगार निर्माण करेल, असाही अंदाज याच अहवालात व्यक्त करण्यात आला होता. कृषी, उत्पादन, वित्त आणि आरोग्यसेवा यांसारख्या उद्योगांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणण्याचे काम हे क्षेत्र करत आहे.
भारताने ‘एआय’ची परिवर्तनीय क्षमता ओळखली असून, विविध क्षेत्रांमध्ये त्याच्या वाढीला चालना देण्यासाठी सक्रियपणे धोरणे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी राष्ट्रीय धोरण विकसित केले असून, ते आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण या प्रमुख क्षेत्रांसाठी रूपरेषा देणारे आहे, असे म्हणता येईल. नवकल्पना आणि आर्थिक वाढीला चालना देतानाच, या तंत्रज्ञानाच्या नैतिक वापराच्या गरजेवर यात भर देण्यात आला आहे. भारतामध्ये नवोद्योग क्षेत्राला त्याचा लक्षणीय फायदा होत आहे. ‘स्टार्टअप इंडिया’ तसेच, ‘डिजिटल इंडिया’ यासारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून नवोद्योगांना त्यासाठी निधी देण्यात येत आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध शैक्षणिक संस्था कौशल्य वाढवण्यावर भर देत आहेत. भारतामध्ये ‘एआय’मध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येण्याची क्षमता असून, भारतात त्यासाठीचे अभियंते मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. संगणकाचा प्रचार आणि प्रसार वाढला तेव्हा भारतीय अभियंत्यांनी ती संधी साधत, जगभरात आपले कौशल्य दाखवून दिले. ‘एआय’ तंत्रज्ञानाने जगाचा नेता होण्याची ही संधी पुन्हा एकदा भारताला मिळवून दिली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौर्यात तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांसोबत परिषदेत सहभाग नोंदवला. या परिषदेतही ‘एआय’ तंत्रज्ञान हाच चर्चेचा प्रमुख मुद्दा राहिला. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला. कौशल्य, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उपक्रम राबवण्यावर यात चर्चा झाली. ही चर्चा भारताच्या प्रगतीला चालना देणारी ठरली आहे. हे तंत्रज्ञान नवनवे उद्योग स्वतःबरोबर आणणार आहे. नव्या संधीही ते उपलब्ध करून देणार आहे. तथापि, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्याचे आव्हान जगासमोर असेल. जगभरात त्यासाठी आदर्श नियमावलीही आखली जात आहे. भारतातही तसे होत आहे. एखादे तंत्रज्ञान विकसित झाले म्हणजे ज्या मानवाने ते प्रत्यक्षात आणले, त्याच मानवाचे भवितव्य ते धोक्यात आणेल, असे होत नाही. विकासासाठी तंत्रज्ञान हे आवश्यकच आहे, हे लक्षात घेतले म्हणजे झाले.