मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नौदलाने उभारलेला पुतळा कोसळला, ही अत्यंत दुर्दैवी बाब. याविषयी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर माफी मागितली. मात्र, ज्या काँग्रेसने आजवर हिंदुद्वेषाचे राजकारण केले, त्या काँग्रेसला आज शिवरायांच्या प्रेमाचे भरते आले आहे. पुन्हा एकदा राज्याला विभागण्याचे पाप मविआ करत आहे.
मालवणमध्ये नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला होता, तो कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मविआने आंदोलने सुरू केली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित केला आहे. ते असे म्हणतात की, “माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, पंडित नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये जे लिहिले आहे, त्या संदर्भात ते काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्यप्रदेशात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून तोडला, त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून बसले आहेत? कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल एक शब्दही ते का बोलत नाहीत. सर्वप्रथम याचे उत्तर द्यायला हवे. तसेच, शिवाजी महाराजांनी सुरत लुटले, असेच आजवर काँग्रेसी इतिहासात शिकवले गेले. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमानच होता. महाराजांनी सुरत लुटले नव्हते, तर स्वराज्याचा खजिना सुखरूप पुन्हा राज्यात आणला होता. सामान्यांना त्यांनी कधीही नाडले नव्हते. तथापि, काँग्रेसने चुकीचा इतिहास शिकवला, त्यांना त्याबद्दल माफी मागायचे धारिष्ट्य उद्धव यांच्यात आहे का?”
मविआच्या या आंदोलनात शरद पवार यांच्यासारखा साडेतीन जिल्ह्यांचा नेताही सक्रिय झालेला दिसून येतो. विरोधकांच्या आंदोलनात शरद पवार आज जातीने उतरले, त्यांचे कार्यकर्तेही पवारांना ‘जाणता राजा’ असे संबोधतात. मात्र, स्वतः पवार शिवरायांना ‘जाणता राजा संबोधण्याची काहीही गरज नाही, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तो महाराष्ट्र पवारांना कधीही शिवरायांचा आहे, असे म्हणावेसे वाटत नाही, त्यावेळी शिवप्रेमींचा अपमान होत नाही का?
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला दिलेला स्पष्ट जनादेश नाकारत, केवळ स्वतःची सत्तालालसा पूर्ण करण्यासाठी, महाभ्रष्ट सरकार राज्यावर लादले, असे उद्धव ठाकरे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची भाषा करतात तेव्हा ते बोलणे हास्यास्पदच ठरते. त्यांचे बोलके पोपट, उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर राजकारणातल्या साधनशुचितेला केव्हाच खुंटीवर टांगले आहे. त्यामुळे त्यांच्या बेताल व्यक्तव्याकडे किती गांभीर्याने पाहायचे, हाही प्रश्नच.
शिवरायांचा पुतळा कोसळला, ही अत्यंत दुर्दैवी बाब. नौदल त्याची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी, त्याबद्दल जाहीर माफीही मागून झाली. त्यानंतरही विरोधकांच्या या आंदोलनातून विरोधकांच्या केविलवाण्या राजकीय परिस्थितीचे दर्शन होत असते. या आंदोलनात उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले, त्याचे अप्रूप वाटत नाही. असेही ते ‘रस्त्यावरच’ आलेले आहेत. सोनियांचे पाय पकडले, तरी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे, उद्धव यांनी आंदोलनात सक्रिय होणे, ही त्यांची वैयक्तिक गरज आहे. तथापि, मुंबईत आंदोलन करताना, त्यांनी पेशवाईचा उल्लेख करत ही भाजपची वृत्ती असल्याचे म्हणताना जातीवादाला पुन्हा एकदा खतपाणी दिले आहे.
काँग्रेस हा हिंदुद्वेष्टा आहे, असे म्हणणे म्हणजे द्व्रिरुक्तीच होईल. काँग्रेसने आजवर कायम हिंदुद्वेषाचेच राजकारण केले. एकगठ्ठा मुस्लीम मतांसाठी त्यांनी मुस्लिमांचे लांगूलचालनच केले, व आजही उघडपणे करत आहेत. शरद पवार हेही काँग्रेसी विचारधारेतूनच आले आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट घडविणार्या कुख्यात दाऊद आणि त्याच्या सहकार्यांना पाठीशी घातल्याचा आरोप त्यांच्यावर कायम होत आला आहे. व्होरा समितीने पवार यांचे गुन्हेगारीविश्वाशी विशेषतः दाऊदशी जवळीक असल्याचा ठपका ठेवल्याची चर्चा आजही रंगते. मुंब्रा येथील आत्मघाती दहशतवादी इशरत जहाँ ही गुजरातमध्ये घातपात करण्यासाठी गेली असता, गुजरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ती मारली गेली. ही इशरत जहाँ निष्पाप मुलगी असल्याचे प्रमाणपत्र देणारे हेच शरद पवार होते. त्यांचा बोलका पोपट ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांनीही तसेच प्रमाणपत्र दिले होते. आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडली याने इशरत जहाँ ही आत्मघाती दहशतवादी असल्याचा कबुलीजबाब दिला, म्हणून ती दहशतवादी असल्याचे मान्य झाले.
काँग्रेस हिंदुद्वेष जोपासता जोपासता आता भारत जोडोच्या माध्यमातून जातीजातींत फूट पाडण्याचे कारस्थान आखत आहे. त्यासाठीच जातनिहाय जनगणनेची मागणी त्यांनी लावून धरली आहे. काँग्रेसी युवराज पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा घाट घालत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसने किती गरळ ओकली आहे, हे उभ्या देशाला ठावूक आहे. अशा काँग्रेसला आज शिवरायांबद्दल एकाएकी जो उमाळा दाटून आला आहे, तो कशासाठी हे सांगायची आवश्यकता नाही. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले आहेत, सत्तेचे लोणी मिळावे म्हणून हे तीन संधीसाधू बोके एकत्र आले आहेत, ते भ्रष्टाचाराचा आरोप करतात यापेक्षा मोठा विरोधाभास नाही. कोरोनाकाळात या तीन पक्षांनी महाराष्ट्राला किती लुटले आहे, ते जनतेने पाहिले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आचार तेजस्वी होते. हिंदुत्वाबाबत त्यांनी कधीही कोणतीही तडजोड केली नाही. एकजुटीने राहा, जाती आणि वाद गाडून हिंदूंची भक्कम एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल असे त्यांनी फार पूर्वीच सांगितले होते. मुस्लिमांचा ते अतिशय थेट शब्दांत उल्लेख करत असत. मात्र, अशा तेजस्वी बाळासाहेबांच्या उद्धव या सुपुत्राने, भगवी शिवसेना हिरवी केली. ‘भगवा’ ही तर हिंदुत्वाची किर्तीपताका, मात्र, तिची या उद्धव ठाकरे यांनी फडके अशा शब्दांत त्यांची संभावना केली. केवळ आणि केवळ सत्तेसाठी हिंदुत्वाचा जरीपटका दूर केला, आणि काँग्रेसी लांगुलचालनाची विचारसरणी अवलंबली. म्हणूनच, त्यांनी हिंदुत्वाचीही विभागणी केली. बाळासाहेब एक राहा म्हणून सांगत होते मात्र, उद्धव यांनी महाराष्ट्र जातपातींत विभागला.
पुतळा पडला, ही गोष्ट दुर्दैवीच. मात्र, त्यावरून राजकीय स्वार्थासाठी संधीसाधू स्वभावाने संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचे जे षङ्यंत्र महाविकास आघाडीने आखले आहे, ते हाणून पाडले पाहिजे. जे आज भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत, त्यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. संजय राऊत स्वतः हजारो कोटींच्या पत्रावाला चाळ प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले आहेत. लवासा प्रकरणात शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा न्यायालयाने नामोल्लेख केला आहे. काँग्रेसी सोनिया आणि राहुल तर पाच हजार कोटींच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. असे असताना केवळ आणि केवळ महायुती सरकारला अडचणीत आणायचे, याच राजकीय हेतूने प्रेरित असलेले महाविकास आघाडीचे नेते शिवरायांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत आहेत, हेही दुर्दैवीच आहे.