यापुढे गडचिरोली राज्यातील ‘पहिला’ जिल्हा! स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून शुभेच्छा

    26-Aug-2024
Total Views |

Devendra Fadanvis


गडचिरोली :
यापुढे गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा असेल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेला ४२ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गडचिरोली जिल्हा स्थापनेला आज ४२ वर्ष पूर्ण झाले असून जिल्ह्यातील नागरिकांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आपण सारे मिळून विकासाच्या आणखी नवनव्या उंची गाठू, हा संकल्प सारे मिळून करुया.”
 
हे वाचलंत का? - संजय राऊतांची उबाठांकडे तक्रार! महिलेचं पत्र व्हायरल
  
“गेल्या १० वर्षांत गडचिरोली जिल्ह्याने विकासाचे अनेक टप्पे गाठले. नक्षल जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत हळूहळू देशातील स्टिल शहर म्हणून ओळख होऊ लागली. या क्षेत्रात सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. आपल्या गडचिरोलीत आता मेडिकल कॉलेज आणि विमानतळसुद्धा साकारतेय. समृद्धी महामार्गसुद्धा गडचिरोलीपर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, “एकीकडे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना या जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला. गर्देवाडा, वांगेतुरी अशा सुदूर भागात पोलिस ठाणी सुरु झाली. पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची व्यवस्था करण्यात आली. रस्त्यांसह मोबाईल कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली. दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमात आमचे पोलिस जनतेचे मित्र बनले. गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे, हीच भूमिका घेत आम्ही काम करतो आहोत आणि यापुढेही करीत राहू,” असेही ते म्हणाले.