मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु!

    08-Jul-2024
Total Views |

Mumbai safty
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास तसेच मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात तसेच मुंबई शहरात उद्भवलेल्या स्थितीचा आढावा या बैठकीदरम्यान घेण्यात आला. यावेळी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
 
पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे." मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून, नागरिकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा तत्परतेने कार्य करत असल्याचे सांगितले. मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली आहे.