नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ऑस्ट्रिया दौर्यावर जाणार आहेत. मंगळवार, दि. ९ जुलै आणि बुधवार, दि. १० जुलै रोजी ते ऑस्ट्रिया दौर्यावर असतील. तब्बल ४१ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रिया दौर्यावर जातील. ऑस्ट्रियाच्या चान्सलरने पंतप्रधानांना खास निमंत्रण दिले आहे.
“मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे येणार आहेत. ही भेट हा एक विशेष सन्मान आहे, कारण ४० वर्षांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांची ही पहिली भेट आहे आणि भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी करत असताना हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबद्दल आणि अनेक भू-राजकीय आव्हानांवर घनिष्ठ सहकार्याबद्दल बोलण्याची संधी मिळेल,” असे ऑस्ट्रियाकडून सांगण्यात आले आहे.
ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निमंत्रणाबद्दल धन्यवाद! हा ऐतिहासिक प्रसंग साजरा करण्यासाठी ऑस्ट्रियाला भेट देणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. मी आपल्या राष्ट्रांमधील बंध मजबूत करण्यासाठी आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी आणि चर्चेसाठी उत्सुक आहे. या भेटीत लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य ही सामायिक पायाभूत मूल्ये अंतर्भूत आहेत, ज्याच्याआधारे दोन्ही देशांतर्गत अधिक जवळची भागीदारी निर्माण करू.”