केरळ सरकारचा हलगर्जीपणा नडला! भुस्खलनाचा इशारा सात दिवसांपूर्वीच दिला होता!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची राज्यसभेत माहिती

    31-Jul-2024
Total Views |

Keral
 
नवी दिल्ली : भुस्खलनाचा इशारा केरळ राज्य सरकारला सात दिवस अगोदरच देण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले; अशी माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत बुधवारी दिली आहे. केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी राज्यसभेत निवेदन केले. केरळच्या डाव्या सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, केरळ सरकारला अशा आपत्तीच्या शक्यतेबाबत आधीच इशारा देण्यात आला होता. सहसा अनेक राज्ये अशा इशाऱ्यांकडे लक्ष देतात, परंतु केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वायनाडमध्ये भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. ते म्हणाले,"या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहेत. मात्र, सभागृहापुढे सत्य आले पाहिजे. २३ जुलै रोजी केरळ सरकारला केंद्र सरकारकडून इशारा देण्यात आला होता. त्यानंतर २४ आणि २५ जुलैलाही इशारे देण्यात आले होते. त्यानंतर २६ जुलै रोजी २० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची आणि त्यामुळे भुस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी जिवीतहानी होऊ शकते, असा इशारा देण्यात आल्याचे शाह यांनी नमूद केले आहे.
 
केरळ सरकारवर ताशेरे ओढताना ते पुढे म्हणाले की, या देशात अशी राज्य सरकारे आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या इशाऱ्यांचा वापर करून शून्य अपघाती आपत्ती व्यवस्थापन केले आहे. नवीन पटनायक ओडिशात सत्तेवर असताना केंद्र सरकापने सात दिवस अगोदर चक्रीवादळाचा इशारा पाठवला होता. त्यानंतर योग्य आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले आणि त्यामुळे केवळ एक मृत्यू झाला. त्यानंतर गुजरात सरकारलाही केंद्रातर्फे ३ दिवसांपूर्वी गुजरात सरकारला चक्रीवादळाचा इशारा पाठवला होता. त्यानंतर राज्य सरकारने सुयोग्य व्यवस्थापन करून एकही मृत्यू होऊ दिला नाही, याचीही आठवण केंद्रीय गृहमंत्र्यांनी करून दिली.