लाडकी बहीण योजना! एका कुटुंबात किती महिलांना लाभ?

    03-Jul-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'मार्फत पात्र महिलांना प्रति महिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, एका कुटुंबातील किती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात? याबद्दल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना घोषित केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत काल काही बदल करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून तर ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना १५०० रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ एकर शेतीची अटही काढून टाकण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासोबतच उत्पन्नाच्या दाखल्याची अटही काढून टाकण्यात आली आहे."
 
हे वाचलंत का? -  नोकरभरतीचा विक्रम! दोन वर्षात १ लाख तरुणांना सरकारी नोकरी
 
"त्यामुळे मी सर्व भगिनींना विनंती करतो की, कोणीही एजंटच्या मागे लागू नका. एजंट येत असल्यास तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला असता काल त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे," अशी माहितीही त्यांनी दिली.
 
ते पुढे म्हणाले की, "या योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून एका कुटुंबात दोन महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. एक विवाहित असल्यास एका अविवाहित महिलेलादेखील हा लाभ देण्यात येणार आहे," असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात सांगितले.