धारावीतील बेकायदा बांधकामांवर कारवाईची मागणी

धारावीच्या सकीनाबाई चाळीतील रहिवाशांची मागणी

    29-Jul-2024
Total Views |

Dharavi
 
मुंबई : धारावी मेन रोडवरील सकीनाबाई चाळ येथील शौचालयाशेजारी असणार्‍या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी सकीनाबाई चाळीच्या रहिवाशांनी केली होती. यासंदर्भात चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष सुभाष मराठे आणि माजी नगरसेविका आशाताई मराठे यांनी सहायक आयुक्तांना पत्र लिहून दाद मागितली.
 
त्यानंतर पालिकेचे सहायक अभियंता परिरक्षण मंडळ -1 यांनी पालिकेच्या सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या टिप्पणीनुसार हे प्रकरण पुढील कारवाईसाठी अग्रेषित करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच पालिकेचा या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता आहे.
 
सकीनाबाई चाळ येथील शौचालयाशेजारी असणार्‍या अनधिकृत बांधकामाला कंटाळून स्थानिकांनी अनेक दिवस पाठपुरावा करून बांधकामावर कारवाई करण्याची मागणी जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली. त्यानंतर सहायक आयुक्तांनी संबंधित प्रकरण सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) विभागाकडे वर्ग केले.
 
या विभागाने दिलेल्या टिप्पणीनुसार शौचालयालगत असणार्‍या झोपड्या अनधिकृतरित्या बांधण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.तसेच सहायक अभियंता परिरक्षण मंडळ -1 यांनीदेखील या प्रकरणी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी पुढील कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
 
मात्र, अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही.त्यामुळे चर्मकार विकास संघाने या बेकायदेशीर बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच बांधकाम निष्कासित न केल्यास चर्मकार विकास संघ तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला.