टी-२० वर्ल्डकप : टीम इंडियाला बाबरसेनेविरुध्द नवा इतिहास रचण्याची संधी!

    09-Jun-2024
Total Views |
ind vs pak match
 

 
मुंबई :       भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात टी २० वर्ल्डकपचा सामना रंगणार असून न्यूयॉर्क येथे दोन संघात लढत होणार आहे. या सामन्याची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा असून चाहते सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत पाक सामना रात्री ८ वाजल्यापासून न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.

दरम्यान, भारताने आयर्लंडविरुध्दचा पहिला सामना जिंकत विजयी सुरूवात केली आहे. तर पाकिस्तानला युएसएसारख्या दुबळ्या संघाकडून पराभव पत्कारावा लागला आहे. आगामी सामन्यात कोण बाजी मारणार हे सामन्याअंती स्पष्ट होणार असून अमेरिकेतील खेळपट्ट्यांचा अंदाज बांधणे जवळपास सर्वच संघांना कठीण जात आहे.

दरम्यान, न्यूयॉर्क येथे होणाऱ्या सामन्याआधी मोठी माहिती समोर आली असून आयसिस दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघातील खेळाडूंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एकंदरीत, सामना सुरू होण्याआधी खेळाडूंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे सुरक्षा पुरवली जाणार असून दहशतवादी संघटनेच्या धमकीनंतर सुरक्षेवर अधिक भर देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर यांनी सांगितले आहे.
 
भारताला सामनाविजयासह नवा विक्रम स्थापित करण्याची संधी मिळणार आहे. वर्ल्डकपमध्ये एका संघाकडून सहावेळा पराभव करण्याचा विक्रम भारतीय संघ करणार का, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानने बांगलादेशला ६ वेळा, श्रीलंकेने वेस्ट इंडिजला ६ वेळा पराभवाची धूळ चारली आहे. त्यानंतर आता इंडियाला अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी आहे.