‘ब्ल्यू स्टार’ची चाळिशी!

    06-Jun-2024
Total Views |
Pro-Khalistan slogans

काश्मीरमधील दहशतवादाचा अंत केल्यानंतर भारतात आता फुटीरतावादी चळवळी जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने खलिस्तानी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. थेट हिंसाचाराऐवजी आता राजकीय पातळीवर ही चळवळ सुरू ठेवली जाईल, असे दिसते. पंजाबमधून दोन खलिस्तानवादी अपक्ष उमेदवारांचा झालेला विजय ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनकच. या देशविघातक कारवायांकडे आम आदमी पार्टीसारखे पक्ष संकुचित राजकारणासाठी दुर्लक्ष करीत आहेत, हे देशाचे दुर्दैव म्हटले पाहिजे.
 
भारताचे एक पंतप्रधान, एक मुख्यमंत्री, एक माजी लष्करप्रमुख आणि हजारो निरपराध नागरिकांचा बळी घेणार्‍या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ या लष्करी कारवाईस नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले या दहशतवाद्याला तेथून हुसकावून लावण्यासाठी आणि भाविकांसाठी हे मंदिर पुन्हा खुले करण्यासाठी १ जूनच्या पहाटेपासून लष्करी मोहीम सुरू करण्यात आली. लष्कराने हरमिंदरसाहिब या पवित्र गाभार्‍यात प्रवेश केला आणि तेथे आश्रय घेतलेल्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्या कारवाईत भिंद्रनवालेही मारला गेला आणि पंजाबमधील खलिस्तानची चळवळ जवळपास संपुष्टात आली. या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ असे नाव देण्यात आले होते. पंजाबमधील राज्यस्तरीय राजकारणात अकाली दलावर मात करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जर्नेलसिंग भिंद्रनवाले या व्यक्तीला उभे केले. भिंद्रनवाले यांनी शिखांसाठी स्वतंत्र देश- खलिस्तानची मागणी केली आणि नंतर त्यांनी काँग्रेस सरकारलाही न जुमानता पंजाबात खलिस्तानसाठी हिंसक आंदोलन उभे केले.
 
समाजात हिंदू आणि शीख अशी फूट पाडून हिंदूंचा नरसंहार सुरू झाला. या हिंसाचाराचा प्रसार फक्त पंजाबपुरता मर्यादित राहिला नाही आणि तो देशात पसरला. या फुटीरतावादी आंदोलनाला पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा आणि अर्थसाहाय्य मिळत होते. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतर पंजाबातील दहशतवादी कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आणि अखेरीस हे राज्य या फुटीरतावादी दहशतवादापासून मुक्त झाले. पण, हे घडेपर्यंत खलिस्तानवाद्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि या कारवाईच्या वेळी लष्करप्रमुख असलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करून या लष्करी मोहिमेचा सूड उगविला. खलिस्तानची चळवळ आता भारतात सक्रिय नसली, तरी ती पूर्णपणे संपलेलीही नाही. आता या चळवळीचे केंद्र कॅनडामध्ये सरकले आहे. कॅनडात शीख समाज फार मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाला असून तो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. या समाजातील काही श्रीमंत व्यक्तींकडून या चळवळीसाठी अर्थसाहाय्य पुरविले जाते. पंजाबात अलीकडेपर्यंत उघडपणे खलिस्तानवादी फलक, मोर्चे किंवा अन्य घडामोडी दृष्यमान नव्हत्या. पण, राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तानवाद्यांना उत्तेजन मिळाले आहे. त्यांची भीड चेपली असून त्यांनी उघडपणे खलिस्तानची मागणी नव्याने करण्यास प्रारंभ केला आहे.

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या निषेधार्थ गुरुवारी पंजाबात बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांना अर्थातच कॅनडा आणि पाकिस्तानमधून अर्थपुरवठा होत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आम आदमी पक्षाचे सरकार या घटनांबाबत उदासीन असून ते सरकार या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहे. यापेक्षाही अधिक काळजी करणारी गोष्ट म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दोन खलिस्तानवादी नेते- अमृतपालसिंग आणि सरबजितसिंग खालसा हे अनुक्रमे खदूरसाहिब व फरीदकोट या मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. सरबजितसिंग हा इंदिरा गांधी यांचा मारेकरी बिआंतसिंगचा मुलगा. अमृतपालसिंगने आता जामिनासाठी अर्ज केला असून न्यायालयाकडून तो मंजूर होण्याची शक्यता आहे. वास्तविक, अमृतपालसिंग हा आसाममधील दिब्रूगडमधील तुरुंगात आहे. त्याने तेथून ही निवडणूक लढविली आणि त्यात विजयीही झाला. पंजाबपासून हजारो किमी दूर असलेल्या तुरुंगात राहूनही अमृतपालसिंग निवडणुकीत विजयी होतो, यावरून पंजाबातील जनतेत खलिस्तानबद्दल आशावाद अजूनही शिल्लक आहे, असेच म्हणावे लागते. ही निश्चितच गंभीर बाब. गतवर्षी हा अमृतपालसिंग अचानक भारतात दाखल झाला. त्याने स्वत:ला भिंद्रनवालेचे कार्य पुढे नेणारा नेता म्हणून समाजापुढे उभे केले. सरकारने जेव्हा त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो भूमिगत झाला आणि दीड महिन्यांनंतर त्याला अटक झाली. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात आला आहे. तेव्हापासून तो दिब्रूगडच्या तुरुंगात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे घटलेले आणि काँग्रेसचे वाढलेले संख्याबळ, पंजाबात आम आदमी पार्टीचे असलेले सरकार आणि अमृतपालसिंगचा निवडणुकीत झालेला विजय यातून काही नव्या घडामोडी निर्माण होतात का, ते पाहावे लागेल. खलिस्तानी चळवळ कदाचित पूर्वीइतकी हिंसक होणार नाही, पण तिला जर राजकीय आणि राजनैतिक स्तरावर पाठबळ मिळत गेले, तर त्यातून नव्या गुंतागुंती उभ्या राहतील. आजवर भारतीयांना फारसा ठाऊक नसलेला आणि तुलनेने निरुपद्रवी कॅनडा या देशाचा खलिस्तानी चळवळीसंदर्भात वारंवार उल्लेख होऊ लागला आहे. कारण, त्या देशातील शीख समाज हा तेथील सत्ताधारी पक्षाची मतपेढी बनला आहे. त्या समाजाच्या मतांसाठी तेथील सत्तारूढ पक्षाचे नेते भारतावर हेत्वारोप करीत आहेत आणि खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देत आहेत. कॅनडाच्या एका संसदीय समितीने नुकताच प्रसिद्ध केलेला एक अहवाल खूपच गंभीर आहे. ‘नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅण्ड इंटेलिजन्स कमिटी ऑफ पार्लमेंटेरियन्स’ (एनसीकॉप) या समितीने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, कॅनडाच्या दृष्टीने चीन हा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून त्यानंतर भारत व रशियाचा क्रम लागतो.

कॅनडात राहणारा खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताच्या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याचा आरोप कॅनडा सरकारने केला आहे. शिवाय आता भारताकडून पन्नून याच्याही हत्येचा प्रयत्न होत असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यावरून दोन्ही देशांचे संबंध सध्या तणावपूर्ण बनले आहेत. बांगलादेशनिर्मितीचा सूड भारताचे तुकडे करून घेण्याच्या ध्येयाने पाकिस्तानी लष्करी नेतृत्त्वाला पछाडले आहे. म्हणूनच आजवर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने बेबंद फुटीरतावाद आणि दहशतवाद फैलावू दिला. त्याच्या जोडीला खलिस्तानी चळवळीलाही सक्रिय साहाय्य केले. सुदैवाने ‘कलम ३७०’ रद्द करून आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून मोदी सरकारने काश्मीरला बर्‍याच प्रमाणात शांत केले आहे. त्यामुळे आता खलिस्तानी चळवळीचे गाडलेले भूत बाहेर काढण्यासाठी पाकिस्तान उतावीळ झाला आहे. त्याला भारतविरोधी आंतरराष्ट्रीय इकोसिस्टीमची साथ लाभत आहे, ही चिंताजनक घडामोड म्हणावी लागेल.