लहरी हवामानाचा शेतीला फटका

आवक घटल्याने शेतीमालाचे दर कडाडले

    10-Jun-2024
Total Views |
 
Crops
 नाशिक : कधी कडक ऊन तर कधी दुष्काळाची झळ, तर मध्येच अचानक जोराचा पाऊस या निसर्गाच्या लहरीपणामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. तसेच बाजारसमितीमध्ये आवक 20 ते 30 टक्क्यांंनी घटल्यामुळे त्याचा परिणाम दरवाढीवर झाला असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर वाढताना दिसत आहेत.
 
त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील धरणे आटल्याने आणि विहिरींनीदेखील तळ गाठल्याने पिकाला पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच पाणी उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणची पिके करपून गेली आहेत. यामुळे अजूनही पुढील काळात भाजीपाल्याचे दर वाढतेच राहाणार असल्याची शक्यता आहे. रोजच्या जेवणात लागणार्‍या कोथिंबिरीने 60 पार केले आहेत, तर मेथीनेदेखील 50 गाठले आहेत.
 
तसेच हिरवी मिरची 40 ते 60 रुपये किलोपर्यंत गेली आहे. वाल 30 ते 40, तर घेवडा 100 ते 120 रुपयांपर्यंत दर वर गेले आहेत. तर दुधी भोपळा 270 रुपये क्रेट विकला जात आहे. ‘नाशिक बाजार समिती’मध्ये व्यापारी वर्गाकडून खरेदी करण्यात आलेला माल मुंबई, सूरत, अहमदाबाद, बडोदा, कल्याण, वाशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. परंतु, आवक घटल्याने स्थानिक बाजारपेठेबरोबरच बाहेरच्या राज्यातदेखील भाजीपाला कमी प्रमाणात पाठवला जात आहे.
ग्राहकांना मोजावे लागतात जास्त पैसे
बाजार समितीमध्ये विकला गेलेला भाजीपाला आणि फळभाज्यांचा दर प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि विक्रेते यांचा नफा आणि वाहतूक खर्च समाविष्ट करून ग्राहकाला भाजीपाला विकला जातो. त्यामुळे किलोचा दर 20 ते 30 रुपयांनी वाढलेला असतो.