पाठीत आहे आजही शत्रुची गोळी; जाणून घ्या कोण आहेत चंदु चॅम्पियन!

    18-May-2024
Total Views |
 
chandu champion
 
अकराव्या वर्षी खेळाडू म्हणून लष्कराच्या तालमीत सामील झालेले मुरलीकांत सुरुवातीला बॉक्सिंग खेळायचे. मात्र १९६५ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात पेटकर यांना अपंगत्व आले. मात्र मुळातच लढवय्या स्वभावाचे असलेल्या पेटकर यांनी कधीच हार मानली नाही. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरुन पेटकर यांनी बॉक्सिंगला रामराम करत जलतरणाकडे आपला मोर्चा वळवला आणि आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिक प्रकारात भारताला जलतरण स्पर्धेत पहिलं सुवर्णपदकही मिळवून दिलं.. पेटकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित चंदु चॅम्पियन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात अभिनेता कार्तिक आर्यन पेटकरांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जाणून घेऊयात पेटकर यांचा खेळाडू ते स्वातंत्र्यसैनिक हा प्रवास कसा होता.
 
भारताला १९५२ साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक कांस्य पदक जिंकून देण्याचा मान महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांना जातो, तसा पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले सुर्वण पदक मिळवण्याचा मान देखील महाराष्ट्राच्याच वीर पुत्राने मिळवला आहे. १९६५च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात जखमी झालेल्या मुरलीकांत पेटकर या सैनिकाने १९७२च्या पॅरालिम्पिकमध्ये जलतरणात हा पराक्रम गाजवला होता.
 
मुरलीकांत पेटकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ला सांगलीच्या इस्लामपूर भागातील पेठ गावी एका गरीब कुटुंबात झाला. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता ते देखील स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे बालपणापासूनच त्यांची सैन्याशी नाळ जोडली गेली.. लहाणपणी पेटकर यांना कुस्ती खेळण्याची आवड होती. दुहेरी महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या आखाड्यात त्यांनी मल्लविद्येचे धडे देखील गिरवले होते. या शिवाय हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू हे खेळसुद्धा आवडीने ते खेळत. पण गावातील एका घरंदाज खेळाडूला त्यांनी कुस्तीत हरवल्यामुळे परिणामी पेटकर यांना गाव सोडून पुण्याला जावं लागलं होतं.. यानंतर काही वर्षांनी पेटकर सिकंदराबाद येथे बॉइज बटालियन लष्करात भरती झाले आणि त्यांचा देश सेवेचा प्रवास सुरु झाला..
 
सैन्यात रुजू झाल्यानंतरही त्यांनी खेळाचे प्रशिक्षण सुरुच ठेवले होते...पण १९६५ साली सेनादलाच्या छावणीवर पाकिस्तानकडून अचानक हवाई हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्य दुपारी चहासाठी छावणीबाहेर पडलो होतो, तेव्हाच पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याचे सैनिकी संकेत मिळाले. घाईने परतीसाठी निघालेल्या सैन्यावर वाटेतच हल्ला झाला. सर्वत्र बॉम्बवर्षाव आणि रक्तपात दिसत होता. या हल्ल्यात नऊ गोळ्या मी झेलल्या. यापैकी एक गोळी आजसुद्धा त्यांच्या मणक्यात आहे. या हल्ल्यामुळे ते खंदकातून रस्त्यावर फेकले गेले. आणि या रस्त्यावरून वेगाने जाणारी एक जीप त्यांच्या पायावरून गेली. त्यानंतर ते जवळपास १७ महिने कोमात होतो. स्मृतिभ्रंशामुळे त्यांचे नावही त्यांना आठवत नव्हते. यातून ते पुन्हा सावरले खरे पण आयुष्यभराचे अपंगत्व त्यांच्या वाट्याला आले.
 
शत्रुच्या या भ्याड हल्ल्याने खचून न जाता पेटकर यांनी १९६८च्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक आणि नौकानयन या क्रीडा प्रकारांत सहभागी होत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण पदकाने त्यांना हुलकावणी दिली. अपंग क्रीडापटूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा प्रथमच पाहून पेटकर यांच्यासह अन्य क्रीडापटूंना आश्चर्य वाटले.त्यानंतर १९७०च्या एडिनबर्ग (स्कॉटलंड) राष्ट्रकुल पॅराप्लेजिक क्रीडा स्पर्धेतील ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरणात पेटकर यांनी सुवर्णपदक जिंकले. याशिवाय भालाफेकीत रौप्य आणि गोळाफेक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. पुढील लक्ष्य स्वाभाविकपणे १९७२च्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचे होते. पण पैशाची तजवीज होत नव्हती. परिणामी जर्मनीला जाणे रद्द करावे लागणार होते. परंतु सेनादल, भारताचे माजी क्रिकेट कर्णधार विजय मर्चंट, टाटा मोटर्स, टेल्को आणि रोटरी क्लब हे मदतीसाठी धावून आले. त्यामुळे पेटकर यांना पॅरालिम्पिक स्पर्धेला पोहोचता आले. या पॅरालिम्पिक स्पर्धेतील ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरणात पेटकर यांनी ३७.३३ सेकंदांची वेळ नोंदवून विश्वविक्रमसुद्धा साकारला आणि सुवर्णपदकावरही नाव कोरले.
 
मरणाच्या दारातून पेटकर केवळ सुखरुपच परत आले नाही तर अपंगत्वावर मात करत त्यांनी देशाचे नाव सुवर्णाक्षरात कोरले.. २०१८ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले... सध्या ते लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना पेटकर सध्या मार्गदर्शन करत आहेत.. तसंच आर्थिक मदत देखील करत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरुणांनी देखील देशासाठी गोल्ड मेडल आणावं अशी इच्छा देखील ते व्यक्त करतात. तर असा या लढाऊ मुरलीकांत पेटकर यांची संघर्ष आणि यशोगाथा कबीर खान दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन अभिनित चंदु चॅम्पियन या चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आरोह वेलणकर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.