पवई उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा सुरळीत

कामगार, कर्मचाऱ्याचे महानगरपालिका आयुक्तांकडून कौतुक

    16-May-2024
Total Views |

pavai


मुंबई,दि.१६ : प्रतिनिधी
वीज उप केंद्रातील बिघाडाचा फटका बसलेल्या पवई निम्नस्तर सेवा जलाशयाच्या कामगार, कर्मचाऱयांनी अहोरात्र प्रयत्न करत या निम्नस्तर सेवा जलाशयाच्या आवारातील विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला. ही कामगिरी बजावलेल्या जल अभियंता खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवार, दि. १६ मे रोजी कौतुक केले. महानगरपालिका आयुक्तांच्या आस्थेवाईक संवादामुळे कामगार, कर्मचारी भारावून गेले.

वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे सोमवार, दिनांक १३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता पवई येथील निम्नस्तर सेवा जलाशय आवारातील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले. परिणामी, पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित होवून कुर्ला पश्चिम येथील पाणीपुरवठा बाधित झाला होता. जल अभियंता खात्यातील परिरक्षण (पूर्व उपनगरे) विभागातील कामगार, कर्मचाऱयांनी अहोरात्र प्रयत्न करुन या उपकेंद्राची आव्हानात्मक दुरूस्ती पहाटे ५ वाजेपर्यंत पूर्ण केली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पवई निम्नस्तर सेवा जलाशय येथील विद्युत उपकेंद्राला आज भेट देवून पाहणी केली. त्यांनी कामगार, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक करत मनोबल वाढविले. जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.