मुंबईतील रेल्वेवरील पूल प्रकल्पांना गती

बीएमसी आणि महारेलमध्ये संयुक्त बैठक

    16-May-2024
Total Views |

ROB


मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी 
मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबईत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरु आहेत. विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामांना गती आहे. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) यांच्यात रेल्वेवरील पूल बांधणी कामांबाबत आढावा बैठक संपन्न झाली.ही संयुक्त बैठक बुधवार, दि. १५ मे रोजी पार पडली.

महापालिका मुख्यालयात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला बीएमसीचे आणि महारेलचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई शहरात सुरू असलेली पुलांची कामे वेगाने तसेच नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या बैठकीत दिले.

मुंबई शहर भागातील जीर्ण पुलांची दुरूस्ती आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महारेलने संयुक्तपणे रेल्वेवरील पुलांची कामे हाती घेतली आहेत. बीएमसी क्षेत्रातील शहर विभागात सुरू असलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. तर प्रत्यक्ष पूल उभारणी प्रकल्पाची कामे ही महारेलमार्फत करण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील रे रोड, भायखळा, टिळक पूल (दादर) आणि घाटकोपर याठिकाणच्या पुलांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. ही कामे वेगाने करण्याचे उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे.
तीन पुलांच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला मंजुरी

मुंबई शहरातील करी रोड पूल, माटुंगा (रेल्वे खालील पूल), महालक्ष्मी पूल आदी पुलांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे.

तीन पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुनरावलोकनानंतरच

ऑलिवंट पूल, ऑर्थर पूल, एस पूल (भायखळा) या तीन पुलांचा सद्यस्थितीबाबत रेल्वे प्रशासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वेच्या २४ एप्रिल २०२४ च्या पत्रानुसार सदर पूल सुस्थितीत असून सद्यस्थितीत या पुलांची पुनर्बांधणीची आवश्यकता नाही. सदर पुलांच्या पुनर्बांधणीबाबतचे पुनरावलोकन रेल्वेमार्फत १० ते १५ वर्षांनंतर करण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे तुर्तास या पुलांचे कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही.

चार पुलांच्या कामाची सद्यस्थिती

1. रे रोड पूल
सद्यस्थिती: ७७ टक्के काम पूर्ण
अंदाजे पूर्णत्वाचा कालावधी : नोव्हेंबर २०२४

2. भायखळा पूल
सद्यस्थिती: ४२ टक्के काम पूर्ण
अंदाजे पूर्णत्वाचा कालावधी : ऑक्टोबर २०२५

3. टिळक पूल
सद्यस्थितीत: ८ टक्के काम पूर्ण

4. घाटकोपर पूल
सद्यस्थिती: १४ टक्के काम पूर्ण