कामवाली बाई आणि वर्किंग वुमनचं समीकरण, ‘नाच गं घुमा’चा टीझरआला भेटीला

    03-Apr-2024
Total Views |
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार
 

movie 
 
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जगात नवरा आणि बायको या दोघांनाही नोकरी आणि घर सांभाळावं लागतं. त्यामुळे वर्किंग वुमनला अर्थातच मोठा आधार असतो तो म्हणजे घरकाम करणाऱ्या बायकांचा. याच विषयावर आधारित परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ (Nach G Ghuma) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून या चित्रपटाचा (Naach Ga Ghuma) भन्नाट टीझर प्रदर्शित झाला आहे.
 
महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे ‘नाच गं घुमा’ चर्चेत असताना या आकर्षक अशा टीझरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
 
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कमावली बाई असते...’ अशा आशयाच्या वाक्यांनी सुरु होणाऱ्या या टीझरमध्ये मग घरची मालकीण आणि घरातील मोलकरीण यांच्यात नेहमीचेच, घराघरात अनुभवाला येणारे, खुमासदार, रंजक संवाद झडतात. ते एवढे खिळवून ठेवतात की, ‘हे काहीतरी वेगळे आहे,’ याची प्रचीती प्रेक्षकाला येवून जाते. फोनवर बोलणाऱ्या मोलकरणीवर म्हणजे आशाताईवर घरातील गृहिणी रागावते, पुढे उशिरा कामावर येण्यावरून या दोघींमध्ये वाद होतो. त्याला प्रत्युत्तर देतना आशाताई ‘बस नाही भेटली...रस्त्यात अॅक्शीटंट झाला होता ..’ अशी कारणे सांगतात. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या दमदार अभिनयाची चुणूक या टीझरमध्ये दिसून येते.
 
अभिनेते स्वप्नील जोशी , मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि, तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुक्ता बर्वे, नम्रता संभेरावसह सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि मायरा वायकुळ यांच्या प्रमुख भूमिका असलेला स्त्रीत्त्वासाठीचा नाच गं घुमा चित्रपट कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे.