"जे आम्हाला जमलं नाही, ते पवारांनी करुन दाखवलं!" असं का म्हणाले फडणवीस?

    03-Apr-2024
Total Views | 149

Devendra Fadanvis & Sharad Pawar 
 
वर्धा : शरद पवारांनी वर्धेत आमचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं आहे. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती त्यांनी करुन दाखवली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी भाजप नेते रामदास तडस यांनी वर्धेतून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
 
मंगळवारी वर्धेत शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी भाजपची सभा पार पडली. यावेळी बोलनाता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काल शरद पवार याठिकाणी येऊन गेलेत. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करुन दाखवली यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या, नगरपरिषदही जिंकली पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. पवार साहेबांनी वर्धेतून पंजा गायब करुन दाखवला यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून सांगून काँग्रेसने इतकी वर्ष राजकारण केलं, त्याच वर्धेतून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं आहे," असे ते म्हणाले.
 
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांना वर्धेतून उमेदवारी देण्यात आली आहे. यावरही फडणवीसांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, "काँग्रेसला हद्दपार तर केलं पण पवारांना उमेदवारच सापडेना. त्यामुळे उमेदवाराचा शोध सुरु झाला पण कुणी उभं राहायलाच तयार नव्हतं. मग त्यांनी काँग्रेसमधून एक उमेदवार आयात केला. मात्र, एक गोष्ट पक्की आहे की, गांधीजींचं वर्धा हे ना काँग्रेसचं आहे ना शरद पवारांचं. ते मोदीजींचं आणि भाजपचं आहे यावर आताच शिक्कामोर्तब झालेलं आहे," असेही ते म्हणाले. दरम्यान, वर्धेत महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अमर काळे तर महायूतीकडून भाजपचे रामदास तडस यांच्यात सामना रंगणार आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121