कवितेचा जन्म भाषा आणि लिपी पलीकडचा

जागतिक कविता दिनविशेष

    21-Mar-2024   
Total Views |
 
kavita
 
आज जागतिक कविता दिवस. पण या कवितेचा जन्म कधी झाला आपण सांगू शकतो का? लिपीचा, भाषेचा जन्म आपल्याला शोधता येऊ शकतो. पण कविता? ती लिखितच असावी असं बंधन तिला नाहीच. खरेतर तिला कोणतीच बंधने नाहीत. वृत्ताची, तालाची, अलंकाराची, कोणतीच. मुक्तछंदात सुद्धा उत्तम कविता असतात की! तिचे निकष केवळ २. अर्थ आणि लय. कविता अर्थगर्भित असते, असावी. ती लय घेऊनच जन्माला येते. लिपी उदयाला आल्या त्यानंतर लेखनकला माणसाला अवगत झाली. त्यानंतर तिचा प्रसार झाला. आणि मग लिखित स्वरूपातील अभिव्यक्तीला आपण साहित्य म्हणू लागलो. परंतु सर्व प्रकारच्या कला माणसाला तोवर अवगत होत्या. आपण ढोबळमानाने त्याचे ६४ भागांत वर्णन केले आहे. कविता ही सुद्धा एक कला च आहे. आणि त्यानंतर साहित्य. सांगते. पूर्वी जेव्हा लेखन माणसाला अवगत नव्हते परंतु त्याला शब्दज्ञान होते, तेव्हा माणूस रचना तयार करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या पोहोचवत असे. आपली संस्कृतीचं मौखिक परंपरेची होती. आपल्या बहिणाबाईंचा बघा ना, एकदम अशिक्षित बाई. अक्षर ओळख शून्य. दाराला बांधलेले डोळे चुलीशी वावर. उंबरठ्याच्या मर्यादा. ती काय म्हणते,
 
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके तवा मियते भाकर.
 
ही कविता केवळ चुलीवरच्या भाकरीसाठीची नाही. ती द्वयर्थी घेता येते. अनेक अर्थांनी घेता येते. लेखिकेला काही अर्थ अभिप्रेत असतील परंतु वाचकांना त्यांचे अर्थ लावायची मुभा इथे आहे. म्हणून ही कला. संसार सुख हवे असल्यास अनेक आवडत्या गोष्टींशी तडजोड करावी लागते. स्त्रियांच्या स्त्रियांना कळणाऱ्या गोष्टी.
 
ही दुःख दैन्य यापासून सुरुवात झालेली कविता विद्रोहाकडे गेली. विद्रोहातून नंतर समाजप्रबोधन. सगळं झाल्यावर तिने हलकं फुलकं रूपही घेतलं. कुसुमाग्रज पृथ्वीचे प्रेमगीत लिहितात. ते म्हणतात,
 
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना
परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
 
पृथ्वी आणि सूर्याचे नाते जरी असले तरीही त्यात सामान्य स्त्रीजातीची कहाणी आहेच. गुलाबी बंधनांचा स्पर्श आहेच. त्या उलट कवी बी गरिबी मांडतात. ते बाप आणि लेकीची कावीत लीहीतात,
 
नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू
 
स्त्रीचा स्वभाव आणि वास्तविकता तसेच नातेसंबंध यातून प्रतीत होतात. मला सर्वात जास्त आवडते ती अरुण धेतरे याची कविता. त्या समजावून सांगतात. त्या स्त्रीला पुरुषाची ओळख देतानाही ही कविता आहे. यासाठी त्यांनी राधा कृष्णाच्या नात्याला घेऊन अन्य म्हणजे राधेचा पती, त्याच्या नावानेच ही लिहिलीय. माझी सर्वात आवडती कविता. त्यातल्या काही अपली अशा,
 
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.
राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.