भाजपमध्ये जाणार का? अशोक चव्हाणांनी दिलं 'हे' उत्तर

    12-Feb-2024
Total Views |

Ashok Chavhan


मुंबई :
भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही आणि भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. माझी पुढची राजकीय भुमिका एक दोन दिवसांत जाहीर करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच आपल्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का? यावर ते म्हणाले की, "भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही आणि भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी माझ्या जन्मापासून तर आतापर्यंत काँग्रेससोबत काम केलेलं आहे. पण आता मला वाटलं की, आता अन्य पर्याय बघायला हवेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. मला कोणाबद्दलही तक्रार करायची नाही. व्यक्तिगत कोणाबद्दल काहीही माझ्या मनात वेगळी भावना नाही. यापुढच्या राजकीय दिशेबाबत येत्या एक दोन दिवसांत निर्णय घेईल. अद्याप मी काहीही ठरवलेलं नाही. यासाठी मला थोडा अवधी लागेल," असे ते म्हणाले.
 
"मला पक्षांतर्गत गोष्टीची कुठलीही जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाची उणीधुणी मला काढायची नाही. तो माझा स्वभाव नाही. मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवं असं मला वाटल्याने मी राजीनामा दिला आहे," असेही ते म्हणाले आहेत.
 
जागावाटपात गती नाही!
 
"महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत ज्या गतीने काम व्हायला हवं होतं त्या गतीने ते होत नाहीये, हे मला जाणवलं. त्यामुळे जर हे काम लवकरात लवकर झाले असते तर निश्चितच महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला असता," असेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तसेच मी राजीनाम्याबाबत आज कुणाशीही बोललो नसून कुठल्याही आमदाराशी संपर्क साधलेला नाही, असे ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.