ठाणे : पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा महायुतीने जिंकून आपले वर्चस्व निर्माण केल्यामुळे गेली तीन दशके वर्चस्व गाजवणार्या बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर ( Hitendra Thakur ) यांच्या साम्राज्याचा अस्त झाला आहे. तर, बोईसर आणि पालघर लढवूनही उबाठाचीही पाटी कोरीच राहिली आहे. २०२४ मध्ये भाजप शिवसेना महायुतीने ठाकुरांच्या आणि उद्धव ठाकरेच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे.
पालघर जिल्ह्यात यापूर्वी बहुजन विकास आघाडीचे साम्राज्य होते. २०१९ मध्ये तीन आमदार बहुजन विकास आघाडीचे होते. डहाणूच्या जागेवर माकपचे आमदार विनोद निकोले निवडून आले होते. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सुनील भुसारा आमदार होते, तर पालघर विधानसभेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार होते.
गेल्या ३० वर्षांपासून वसई-विरार मतदारसंघावर हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व होते. २००९च्या निवडणुकीचा अपवाद वगळता, येथे अन्य कुणाला विजय मिळवता आला नव्हता. २००९च्या विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. परंतु, त्यावेळी हितेंद्र ठाकूर उमेदवार नव्हते. त्यानंतरच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी पंडित यांचा पराभव केला. या पराभवाचे उट्टे आता दहा वर्षांनंतर विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे-पंडित यांनी काढले असून, त्यांनी वडिलांच्या पराभवाचा तर बदला घेतलाच, शिवाय ठाकूर यांच्या साम्राज्याला मोडीत काढले.
नालासोपारा या मतदारसंघात पैसेवाटपाचे कथानक रचूनही या मतदारसंघात भाजपचे राजन नाईक निवडून आले आहेत. त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांचा पराभव केला आहे. दोनवेळा निवडून आलेल्या क्षितिज ठाकूर यांना हॅट्ट्रिक करता आली नाही. बोईसर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे यांनी ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याला धक्का देत बहुजन विकास आघाडीच्या ताब्यातील हा मतदारसंघ हिसकावून घेतला.
पालघर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी श्रीनिवास वनगा हे शिवसेनेतून निवडून आले होते. परंतु, त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करूनही त्यांना उमेदवारी नाकारल्याने घडलेल्या नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंनी पडदा टाकला. या मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने जयेंद्र दुबळा यांना, तर शिंदे गटाने माजी खा. राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. या लढतीत गावित यांनी लिलया बाजी मारली.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली होती. या मतदारसंघात भाजपने हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिली होती. महायुतीतील बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीच्या सुनील भुसारा यांना होईल, असे चित्र रंगवले जात होते. परंतु, प्रत्यक्षात भाजपच्या भोये यांनी ‘कमळ’ फुलवले.
डहाणू मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपला समर्थन दिल्याने ‘ट्विस्ट’ निर्माण झाला होता. मात्र, माकपच्या विनोद निकोले यांनी भाजपच्या विनोद मेढा यांचा निसटत्या फरकाने पराभव केला. आता पालघर लोकसभा मतदारसंघ आणि पालघर जिल्ह्यातील सहापैकी भाजप तीन, शिंदे गट दोन अशा पाच विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचे वर्चस्व निर्माण झाल्याने ठाकूरांचे साम्राज्य लयाला गेले आहे.