मुंबई : महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील जागांवरून वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने विदर्भातील जास्तीत जास्त जागांवर दावा केला आहे. परंतू, काँग्रेस या जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे जागावाटपावर मविआतील तिन्ही पक्षांची अंतिम बोलणी होण्याच्या आधीच उबाठा गटाने परस्पर उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणूकीवेळी रामटेक आणि अमरावती या दोन जागा उबाठा गटाने काँग्रेसला दिल्या होत्या. याचाच मोबदला म्हणून आता उबाठा गटाला विदर्भात १२ जागा हव्या आहेत. मात्र, या जागा देण्यास काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. काँग्रेसचे अनेक मोठे नेते विदर्भातील असल्याने इथे त्यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सध्या घमासान सुरु आहे.
विदर्भातील सावनेर, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, मलकापूर, रिसोड, अमरावती, तिवसा, देवळी, साकोली, आमगाव, राजूरा, ब्रम्हपूरी या जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. तर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेलेले उमरेड विधानसभेचे आमदार राजू पारवे हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. याशिवाय दर्यापूरचे बळवंत वानखेडे आणि वरोरा विधानसभेच्या प्रतिभा धानोरकर हे दोघे लोकसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे सध्या विदर्भात काँग्रेसचे १२ आमदार आहेत. तर केवळ बाळापूर हा एकच विधानसभा मतदारसंघ उबाठा गटाकडे आहे.
विदर्भात केवळ एकच जागा असतानाही उबाठा गटाने विदर्भातील जास्तीत जास्त जागांवर दावा केला आहे. शिवाय यातील काही जागा काँग्रेसकडून खेचूनही आणल्या आहेत. त्यामुळे विदर्भात उबाठा गटाची ताकद नसतानाही जास्त जागांचा हा आग्रह कशासाठी? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.