रसिका शिंदे-पॉल
मुंबई : लोकसंगीत आपल्या कणखर आवाजातून घराघरांत पोहोचवणारे गायक प्रल्हाद शिंदे यांनी आजवर अनेक भक्तीगीते, कव्वाली गीते गायली. त्यांच्या गायकीचा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच आनंद शिंदे आणि मिलींद शिंदे यांनी जपला. आपल्या घराण्याचा वारसा खरंतर इतकी वर्ष जपून पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणे ही बाब सोप्पी नाही. परंतु, शिंदे घराण्यातील प्रत्येक पिढीने शिंदेशाही बाणा आपल्या गायकीतून कायम जपला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदर्श शिंदे. प्रत्येक नातवासाठी त्याचे आजोबा त्याचे मित्र असतात आणि त्यांचे नाते खास असते. आदर्श शिंदे यांनी वयाच्या १३ व्या वर्षी पहिले भक्तीगीत रेकॉर्ड केले. त्यावेळेची आठवण सांगताता आपल्या आजोबांच्या म्हणजे प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणीत ते भावूक झाले.
..आणि आजोबा म्हणाले मी माझ्या नातवाचं रेकॉर्डींग करणार
आदर्श शिंदे यांच्या गाण्याची सुरुवात किंवा पहिले रेकॉर्डींग देखील भक्तिगीतापासूनच झाले होते. भीमगीते, भक्तीगीते कव्वाली गाणी गाऊ श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे लोकसंगीत गायक प्रल्हाद शिंदे यांचा. आपल्या आजोबांची एक खास आठवण यावेळी आदर्श यांनी सांगितली. ”पंढरीच्या नाथा हा अल्बम माझ्या वडिलांनी केला होता, ज्यातील गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केले होते. यात विठ्ठलाची १० गाणी होती. यापैकी माझे आजोबा, वडिल, काका आणि मी असे प्रत्येकी दोन गाणी आम्ही गाणार होतो. मुळात माझ्या वडिलांची इच्छा होती की माझ्या आजोबांसोबत माझे एखादे गाणे रेकॉर्ड झाले पाहिजे. अगदी १३ वर्षांचा होतो मी आणि त्यावेळी हा अल्बल रेकॉर्ड केला जात होता. तर रेकोर्डींच्या दिवशी माझ्या गाण्यानंतर आजोबांचे गाणे रेकॉर्ड होणार होते. पण आजोबा कामानिमित्त बाहेर होते तरीही माझे पहिले गाणे रेकॉर्ड होणार असल्यामुळे त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवून स्टूडिओत हजेरी लावली होती. आणि महत्वाची बाब म्हणजे पप्पा माझ्या रेकॉर्डींगला बसले होते. त्यांना बाजूला सारुन आजोबा म्हणाले बाजूला हो मी माझ्या नातवाचं गाणं रेकॉर्ड करणार. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता”. आजोबांनी नेहमीच गाणं कसं गायचं, कोणत्या भावनांचा शब्दांतून उच्चार कसा करायचा हे शिकवलं त्यामुळे आजोबांचा तोच आर्शिवाद आजही माझ्यासोबत कायम आहे याचा अभिमान असल्याच्या भावना देखील व्यक्त केल्या.
घराणेशाही शाप की वरदान?
सध्या प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही दिसून येते. मग ते राजकारण असो किंवा मग चंदेरी दुनिया. पण आपल्या कतृत्वावर स्वत:ला सिद्ध करत आपल्या घराण्याचेही नाव मोठे करणारे फार कमी कलाकार आहेत. याच घराणेशाहीवर भाष्य करताना आदर्श म्हणाले की, “एखाद्या नावाजलेल्या गायकी घराण्याचे नाव पुढे घेऊन जाताना मला दडपण आले आणि अजूनही येतेच. कारण, ज्यावेळी मी गाणं शिकत होतो तेव्हा माझ्याच क्षेत्रातील बऱ्याच जणांनी हे म्हटले होते की, तुझं काय तु शिंदे घराण्यातून येतोस, तुला संधी मिळणारच. पण वास्तविक जीवनात तसं नाही आहे. अनेक कलाकारांचा माझ्यावर डोळा होता; आता आदर्श पुढे काय करणार? कारण घराण्याचा जरी आपण भाग असलो तरी गाणं हे प्रत्येकाच्या गळ्यात असते आणि ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याच गायकीतून करायचे असते. त्यामुळे माझ्या प्रवासही फार सोप्पा नव्हता हेही तितकेच खरे. आत्तापर्यंत ऑडिशन देऊनच मी प्रत्येक गाणं गायलं आहे. प्रसंगी मी रिजेक्शनचा देखील सामना केला आहे. त्यामुळे घराणेशाहीमुळे तुमचा ठराविक क्षेत्रात पाया भक्कम होतोच असे नाही, स्वत:ला देखील तितकेच कष्ट करावे लागतात”. त्यामुळे घराणेशाही ही शाप आणि वरदान दोन्ही ठरु शकते हे आदर्श यांनी आपल्या शब्दांतून नकळतपणे व्यक्त केले. आपल्यात स्वत:ला सिद्ध करण्याची, आपल्यातील कलागुणांना वाव देण्याचे सामर्थ्य असल्यास घराणेशाही वरदान असून शकते. परंतु, केवळ घराण्याच्या नावाखाली दिखाऊपणा केला तर तो शाप नक्कीच ठरु शकतो यात वाद नाही.