रसिका शिंदे-पॉल
मुंबई : गणेशोत्सव आला की सर्वदुर उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण निर्माण होते. सामान्यांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत सगळेच गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठ्या आनंदात गणेशोत्सव पार पडतो. मात्र, पुण्यात हा उत्सवाचे वेगळेच रंग दिसून येतात. उत्सव म्हणजे उर्जा आणि उर्जा म्हणजे मनोरंजन क्षेत्र चित्रिकरण असो किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असो गणरायाच्या आगमनासाठी कलाकारांचे ढोलताशा पथक दरवर्षी सज्ज असते. यावर्षी देखील कलाकारांच्या ढोलताशा पथकाने कंबर कसली आहे. दरवर्षी वादक म्हणून गणेशाचे पारंपारिक पद्धतीने आगमन कलाकार मंडळी करतात. '
कलावंत ढोलताशा' पथकाची संकल्पना अभिनेता आस्ताद काळे याने मांडली आणि त्याला दुजोरा देत अभिनेता सौरभ गोखले याने इतर इच्छुक कलाकारांची फौज गोळा करत हे ढोलताशा पथक उभं केलं.
वादनाची शिस्तबद्ध तालीम महत्वाची
“कलाकारांचे ढोलताशा पथक असावे ही संकल्पना मला एका व्हॉट्सएप ग्रुपमुळे सूचली. त्या ग्रुपमध्ये अनेक कलाकार होते ज्यांना ढोलताशा वाजवण्याची इच्छा होती, तर काही कलाकार हे आधीपासून कोणत्यातरी पथकाचे वादक होते. मग अशी संकल्पना सुचली की कलाकारांनी वेगवेगळ्या जागी किंवा पथकांमध्ये जाऊन वादन करण्यापेक्षा एकत्रित येत एका पथकात वादन केले तर अधिक उत्तम होईल. आणि त्यानंतर मग सौरभ गोखले आणि इतर कलाकारांच्या मदतीने कलावंत ढोलताशा पथक उभे राहिले आणि गेली १० वर्ष अविरतपणे गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत आम्ही सर्व कलाकार तल्लीन होऊन वादन करतो. पहिल्या वर्षी मला वादनाच्या तालमीची फार गरज होती कारण मी कधीही पुर्वी वादन केले नव्हते. शिवाय मनोरंजनसृष्टीत काम करत असल्यामुळे तालमींना वेळ देत शिस्तबद्ध पद्धतीने सराव करण्याची गरज होती. त्यामुळे मी चित्रिकरणातून वेळात वेळ काढून मुंबई ते पुणे असा प्रवास करत तालमी करायचो. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आता मी इतरांना वादन शिकवतो, तर हे मला कलावंत ढोलताशा पथकाने दिले आहे”.
- आस्ताद काळे, अभिनेता
लोकांच्या प्रतिक्रिया वादक म्हणून आमचा उत्साह द्विगुणित करतात
“पुण्याचा असल्यामुळे शालेय जीवनातच ढोलताशाची पार्श्वभूमी मला लाभली होती. अर्थात शाळेत कधी वादन केले नव्हते, परंतु ज्यावेळी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यावेळी गणेशोत्सवादरम्यान, इतर वादनाची पथके आम्हाला बोलवायची. त्यामुळे कलाकारांनीच वादक म्हणून समोर यावे अशी इच्छा मनात आली आणि 'कलावंत ढोलताशा' नावारुपास आले. या पथाकाचे नाव काय असावे यावरुन चर्चा सुरु असताना कलाकारांना एकत्रित करुन हे पथक सुरु केले आहे तर मग कलावंत हे नाव हवे असे अभिनेता श्रीकर पित्रे याने सुचवले. आणि सर्व कलाकारांच्या सहमतीने 'कलावंत ढोलताशा' पथक हे नाव ठरले. २०१४ साली सुरु झालेल्या कलावंत ढोलताशा पथकाने पहिले वादन पुण्याच्या तांबडीजोगेश्वरी या मानाच्या गणपतीचे केले होते. आणि सर्वात आनंद या गोष्टीचा वाटतो ज्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं कलावंतचे वादन कुठे आहे हे वाचून येतात आणि दाद देतात. त्यामुळे एक वादक म्हणून दरवर्षी बाप्पाच्या मिरवणूकीत वादन करण्याचा उत्साह द्विगुणित होतो”.
-सौरभ गोखले, अभिनेता
...त्यावेळी कलाकार केवळ वादक असतात
“मी कलावंत ढोलताशा पथकाचं भाग होण्याचं कारण हा सौरभ गोखले आहे. कारण मी दे धक्का २ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात गेलो होतो. त्यावेळी सौरभ मला म्हणाला की, वादनाची तालीम करतोय आम्ही ये तु. तर तिथे गेल्यावर त्याने कंबरेला ढोल लावला आणि त्याच क्षणापासून मी कलावंतचा वादक झालो. वादनाच्या तालमीसाठी मी सकाळी ५ वाजता मुंबईहुन पुण्याला जायचो. खरं तर कलावंत ढोलताशा पथकात कोणताही कलाकार ग्लॅमर किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी वादन करत नाही. तर केवळ पथकाचा वादक म्हणूनच तो वादन करतो याचा मला आनंद आहे. कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून हे सर्व कलाकार आपली परंपरा, संस्कृती जपत आहेत याचा अभिमान आहे”.
- सिद्धार्थ जाधव, अभिनेता
सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा 'कलावंत ढोलताशा' जपते
“कलावंत ढोलताशा पथक माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लहानपणापासूनच वादनाची आवड असल्यामुळे शाळेनंतर ढोलताशा पथकात रुजू झाले. पण काही कामांमुळे रोजच्या तालमी करणे शक्य होत नव्हते. त्यानंतर कलावंत ढोलताशा पथकाचा भाग होण्याची संधी मिळाली जिथे सर्वच कलाकार आहेत. मुळातच कलावंत ढोलताशा पथकात सर्व कलाकार मंडळी असल्यामुळे चित्रिकरण किंवा अन्य कामांची वेळेनुसार पडताळणी करुनच तालमींच्या वेळा ठरत असल्यामुळे वादनाची उमेद अधिक वाढू लागली. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपराच आपल्याला एकत्रित येत कार्य करण्यास सांगते. आणि माझ्यामते ढोलताशा पथक ते कार्य पुणत्वास नेते”.
-अनुजा साठे, अभिनेत्री