सनातनविरोधी कुनिती समूळ नष्ट करण्यासाठी संघटित व्हा!

रा.स्व.संघाचे संपूर्ण समाजाला आवाहन

    16-Sep-2023
Total Views |

manmohanji vaidya

मुंबई : "‘सनातन’ आणि ‘रिलिजन’ या अर्थी वापरला जाणारा ‘धर्म’ या दोन शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. सनातन वास्तविक हिंदुत्वाचाच एक भाग आहे. देशाची लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय सर्वांचाच धर्माशी कुठेना कुठे संबंध आहे. परंतु सनातन संपवण्याची कुनिती समाजात काहीजणांकडून होत आहे. अशी कुनिती जास्तकाळ टिकत नाही. ती समाजातून दूर करण्याचे काम संघ स्वयंसेवक करत आहेतच. मात्र ती समूळ नष्ट करण्यासाठी संपूर्ण समाजाने संघटित होणे गरजेचे आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य यांनी केले. रा.स्व.संघाची अखिल भारतीय समन्वय बैठकीचा समारोप शनिवार, दि. १६ सप्टेंबर रोजी झाला. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हे देखील उपस्थित होते.

पुण्यात एस.पी.कॉलेज येथे झालेल्या या तीन दिवसीय बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी यांच्यात अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. विशेषतः संघ प्रेरणेने सुरु असलेल्या संघटनांमध्ये महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल यावरही चर्चा झाली. तसेच संघाशी संबंधित नसलेले पण राष्ट्रप्रथम या दृष्टीने विचार करणाऱ्यांशी कसा संपर्क करता येईल याचाही विचार करण्यात आला. सरसंघचालकांच्या उद्बोधनाने बैठकीची सांगता झाली.

उदयनिधी स्टॅलिनने सनातन विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानावर डॉ. मनमोहनजी वैद्य पुढे म्हणाले की, "सनातन धर्म संपवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. निव्वळ राजकारणासाठी अशी विधाने केली जात आहेत. मात्र अशा सनातन विरोधकांना त्या शब्दांचा अर्थ मुळात माहित आहे का? मुळात धर्म आणि रिलिजन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ईश्वर हा एक आहे. त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग जरी वेगळे असले तरी ते समान आहेत, हे मानणं हा भारताचा मुळ दृष्टीकोन आहे. त्यामुळे संघ स्वयंसेवक सनातन विरोधी कुनिती समाजातून दूर करण्यासाठी कायम प्रयत्न करत आले आहेत. मात्र आता यासाठी समाजाने संघटित होण्याची खरी गरज आहे."

आरक्षण आणि मणिपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, की "अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (शेडूल कास्ट, शेडूल ट्राईब) यांना आपल्याच समाजाने दुर्दैवाने वंचित ठेवले. त्यांच्याकडे कायम दुर्लक्षित केले. सन्मान, सुविधा आणि शिक्षणापासून दूर ठेवले. त्यांना समान वागणूक मिळावी याकरीता संविधान संमत जे आरक्षण आहे ते त्यांना मिळाण्याची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक विषमतेला दूर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर मणिपूरची स्थितीही निश्चितच चिंताजनक आहे. त्याबाबतीत सरकार योग्य निर्णय घेईलच. मात्र सध्या तेथील संघ स्वयंसेवक हे दोन्ही समाजातील लोकांच्या संपर्कात असून विस्थापितांसाठी सेवाकार्य सुरु आहे."

संघप्रेरित संघटनांमध्ये महिलांच्या सहभागाबाबत बोलताना मनमोहनजी पुढे म्हणाले की, "भारतीय जीवनदृष्टीमध्ये कुटुंब हे सर्वात लहान एकक आहे. कुटुंबात स्त्रियांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे राहण्याची भूमिका बजावली पाहिजे. या महिलांमध्ये व्यापक संपर्क कसा वाढेल तसेच देशाच्या विकासात महिलांचा सहभाग कसा वाढेल, या हेतूने विभाग स्तरावर महिला संमेलन भरवण्याचे संघाने ठरवले आहे. त्यामुळे सध्या विविध क्षेत्रातील महिला म्हणजेच अशासकीय संघटना (एनजीओ)चालवणाऱ्या, सामाजिक, धार्मिक संस्थांच्या प्रमुख, शिक्षण-प्रशासन सेवेत कार्यरत असणाऱ्या, माध्यमांमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला, जाती-जनजातीच्या प्रमुख, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, साहित्यिक, लेखिका, वक्ता, ग्रामपंचायत प्रमुख, आदींशी संपर्क करून ऑगस्ट ते जानेवारी कालावधीत अशी संमेलनं होत आहेत. अशा महिलांमधील परस्परसंपर्क वाढवण्यासाठी देशभरात विभाग स्तरावर ४११ महिला संमेलने आयोजित केली जाणार आहेत. १२ प्रांतात एकूण ७३ संमेलनं झाली असून तब्बल १ लाख २३ हजार महिलांचा सहभाग यात नोंदविण्यात आला आहे. त्यात संघाशी संबंधित नसलेल्यांचाही सहभाग आहे."

संघकार्याच्या विस्ताराबाबत माहिती
*२०२० मध्ये - ३८,९१३ स्थानांवर संघ शाखा
२०२३ मध्ये - ४२, ६१३ स्थानांवर संघ शाखा

*दैनंदिन शाखा :-
२०२० मध्ये - ६२४९१
२०२३ मध्ये- ६८६५१

*साप्ताहिक मिलन
२०२० मध्ये- २०३००
२०२३ मध्ये- २६८७७

*मासिक मिलन
२०२० मध्ये- ८७३२
२०२३ मध्ये- १०४२२

*Join RSS मधून आलेल्या मध्ये दरवर्षी १ ते सव्वा लाखांनी वाढ  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.