अत्याचार, भ्रष्टाचारात राजस्थान पहिल्या स्थानी: देवेंद्र फडणवीस

परिवर्तन यात्रेत देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

    13-Sep-2023
Total Views |

devendra fadanvis


मुंबई :
“राजस्थान ही महाराणा प्रताप यांची पवित्र भूमी आहे. पण, गहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने राजस्थान हा अत्याचार आणि भ्रष्टाचारात क्रमांक एकवर आणून ठेवला,” अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजस्थान भाजपच्यावतीने आयोजित परिवर्तन यात्रेत देवेंद्र फडणवीस मंगळवारी सहभागी झाले. त्यांनी राजस्थानमधील पाली, सोजत, जैतारन, ब्यावर विधानसभा मतदारसंघांमध्ये जाहीर सभा, स्वागत सभांना संबोधित केले. या यात्रेत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, परशुरामगिरी महाराज, सहप्रभारी विजया रहाटकर, पी. पी. चौधरी, राजेंद्र गहलोत उपस्थित होते.

”राजस्थान सरकार केंद्र सरकारकडून निधी घेते आणि त्याच निधीचा भ्रष्टाचार करते. मग केंद्र सरकारवरच टीका करतात. गहलोत यांनी राजस्थानला बलात्कार, अत्याचार आणि भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आणले. महाराणा प्रतापांच्या भूमीवर हे अजिबात शोभनीय नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, “आज जगभरात भारताचा गौरव वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

‘सनातन धर्म कधीच संपणार नाही’

जेव्हा भारताचा जगात गौरव वाढतो आहे. तेव्हा राहुल गांधी मात्र विदेशात जाऊन चीनचे कौतुक करीत होते. बाहेर जाऊन आपल्याच देशाची निंदा करणारा नेता असू तरी शकतो का? अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते. पण, ते विदेशात जाऊन भारताची भूमिका मांडत होते, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काही लोक सनातन धर्माला संपविण्याचा प्रयोग करू पाहत आहेत. या नेत्यांची विधाने ही संयोग अजिबात नाही. सनातन धर्म तर कधी संपणार नाही. पण, जो हा विचार करतील, त्यांना संपविण्याचे काम या देशातील जनता मतदानातून करेल. आम्ही खुर्चीसाठी नाही, तर देशकल्याणासाठी राजकारण करतो.”

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.