मुंबई : मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असून बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांची सुविधा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येणारी लहान मुले, दिव्यांग आणि वृद्धांकरिता बॅटरीवर धावणाऱ्या चार वाहनांची सुविधा महिनाभरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट दिली असून त्यांनी संपूर्ण प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. यावेळी प्राणिसंग्रहालयातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यटकांची व उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. या भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी लहान मुले, दिव्यांग व वृद्धांना प्राणिसंग्रहालयात फिरण्याकरिता पर्यावरणपूरक वाहनाची सोय करण्यात यावी, अशा सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयास बॅटरीवर धावणाऱ्या आठ आसनी चार वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून ही चारही वाहने उद्यान सुरू असणाऱ्या वेळेत म्हणजे सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत वय ३ ते १२ वर्षांपर्यंतची मुले यांच्यासह वृद्धांकरिता देखील उपलब्ध असणार आहेत. सदर वाहनांची खरेदी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून निधी हस्तांतरीत केला जाणार आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.