सतिश कौशिक यांच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडला धक्का!

    09-Mar-2023
Total Views |
 
Satish Kaushik
 
मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक यांचं आज निधन झालं. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सतिश कौशिक यांचं अचानक निधन झाल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. आपल्या विविधांगी भूमिकांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आणि चेहऱ्यावर कायम हास्य असलेले अभिनेते राहिले नाहीत या वृत्तावर बॉलिवूड अभिनेत्यांचा विश्वासच बसत नाहीये. अनेकांनी तर ट्विट करून हा आपल्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे.
 
 
 
सतिश कौशिक यांनी अत्यंत जल्लोषात होळीचा उत्सव साजरा केला होता. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी जुहू येथे होळीच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात सतिश कौशिक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या सहकारी कलाकरांसोबत होळीचा आनंदही लुटला होता. जावेद अख्तर, रिचा चढ्डा, अली फजल आणि महिमा चौधरींसोबत त्यांनी होळी खेळतानाचे फोटोही काढले होते.
 
त्यांनी हे फोटो ट्विटरवर शेअरही केले होते. या फोटोत कौशित अत्यंत प्रसन्न मुद्रेत दिसत आहेत. मौजमजा करताना दिसत आहेत. ते आजारी आहेत, असं कुठेही वाटत नाही. आणि आज मात्र सतिश कौशिक यांच्या निधनाची बातमी येऊन धडकल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
 
 
 
सतिश कौशिक यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चांगल्या भूमिका केल्या. मिस्टर इंडियापासून ते दिवाना मस्तानापर्यंतच्या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. जाने भी दो यारो, कागज, कर्ज, जमाई राजा, साजन चले ससुराल, मिस्टर अँड मिसेस खिलाडी आदी सिनेमातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. तर हम दिल दे चुके है सनम, तेरे नाम, शादी से पहले आदी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.