होय, हा राष्ट्रद्रोहच!

    08-Mar-2023
Total Views |
Editorial on Rahul Gandhi defaming Indian democracy, Prime Minister at global stage


आपल्याच देशाची, पंतप्रधानांची, लोकशाहीची जागतिक स्तरावर केवळ राजकीय विद्वेषातून बदनामी करणे हा राहुल गांधींनी केलेला राष्ट्रद्रोहच! त्यामुळे मुखी ‘भारत जोडो’चा नारा आणि परदेशात ‘भारत तोडो’च्या अपप्रवृत्तींना थारा, असा हा राहुल गांधींचा ढोंगी दुटप्पीपणा भारताला ‘काँग्रेसमुक्त’ केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही!


असं म्हणतात की, आपल्या घरच्यांविषयी बाहेर कुठे बोलताना, तक्रारींचा सूर लावताना जरा तोंड सांभाळूनच बोलावे. कारण, समोरची तिर्‍हाईत व्यक्ती त्याकडे नेहमीच सहानुभूतीपूर्वक न बघता, तुमच्या त्या परिस्थितीचा कळत-नकळत फायदाही घेऊ शकते. याच साध्या, सोप्या अलिखित नियमाचे जर कौटुंबिक, मित्रपातळीवर आपण भान ठेवून एरवी वागत-बोलत असू, तर मग आपल्याच देशाची परदेशात बेअब्रू होईल, अशा वारंवार होणार्‍या उद्दाम वर्तनाला राष्ट्रद्रोह नाही, तर आणखीन काय म्हणावे? राहुल गांधी या महाशयांचे भारताच्या बदनामीचे हेच उद्योग मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जोरात सुरू आहेत. त्यात ‘भारत जोडो’ यात्रेनंतरही सफलता कुठे दृष्टिपथात दिसत नसल्यामुळेच राहुल गांधींचे संतुलन अधिकच ढासळलेले दिसते. त्यामुळे भारतात असतील किंवा परदेशात, जिथे-तिथे काँग्रेसच्या या युवराजांनी भारताच्या, भारतीयांच्या प्रतिमेची लक्तरे वेशीवर टांगण्याची एकही संधी दवडली नाही. भारताला कोणेएकेकाळी गुलाम बनवणार्‍या ब्रिटनच्या धरतीवरूनच राहुल गांधी भारताच्या बदनामीचे असे उच्चरवाने गोडवे गाताना दिसतात. यावरुनच राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भारतप्रेमाच्या निष्ठा या केवळ आणि केवळ तोंडदेखल्या, मतदारांची दिशाभूल करणार्‍या आहेत, हे त्यांच्या कृती आणि वाणीतून सिद्ध होते.

खरंतर राहुल गांधी या व्यक्तीविषयी आजवर हजारदा लिहिले-बोलले गेले. ही व्यक्ती नेमका काय आणि कसा (अ)विचार करते, याची आता देशवासीयांनाही चांगलेच ठाऊक. म्हणूनच या पप्पूला फारसे गांभीर्याने घेऊच नये, असाही एक सूर उमटतोच. परंतु, जेव्हा एखाद्या राष्ट्रीय पक्षाची अध्यक्ष राहिलेली, संसदेतील खासदारपदावरील व्यक्ती सातत्याने आपल्याच देशातील कपोलकल्पित दोषांचा असा परदेशात सारखा पाढा वाचते, तेव्हा या टीकांआड देशविरोधी षड्यंत्राचाच वास येत राहतो. त्यातही राहुल गांधी यांचे चिनी कम्युनिस्ट पार्टीशी असलेले ऋणानुबंध तर अगदी सर्वश्रूत. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता, सत्ता पदरात पाडण्यासाठी सध्या अशाच भारतविरोधी शक्तींना खूश करण्याचा राहुल गांधींचा हा कुटील डाव दिसतो. म्हणजे मागील काही दिवसांची ‘क्रोनोलॉजी’च बघा. आधी ‘हिंडेनबर्ग’ने अदानीला लक्ष्य केले, त्यानंतर अदानीवरून भारतद्वेष्ट्या सोरोसने मुक्ताफळे उधळली. यादरम्यानच ‘बीबीसी’ने गुजरात दंगलीवरील मोदींना लक्ष्य करणारा वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला. तेव्हा, हा सगळा घटनाक्रम लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला परदेशातून पद्धतशीरपणे लक्ष्य करण्याचे मनसुबे स्पष्ट होतात. त्यातच पुढील वर्षी म्हणजे २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देशातील वातावरण गढूळ करण्यासाठीच २०२३च्या अगदी प्रारंभीपासून ही मोदीविरोधी, भारतविरोधी आणि हिंदुत्वविरोधी अजेंड्याची मोहीम जोर धरू लागली.


‘भारत जोडो’ यात्रेनंतरही देशातील मोदीप्रेमाची लाट कमी होत नाही म्हटल्यावर राहुल गांधींनी परदेशातील भारतविरोधी शक्तींशी संधान साधल्याचेच या घटनाक्रमावरून खरंतर सिद्ध व्हावे. कारण, राहुल गांधींनी मोदींविरोधी आता देशात कितीही आदळआपट केली तरी उपयोग शून्यच. माध्यमांनीही राहुल गांधींच्या भाजपविरोधातील तथ्यहीन, फुटकळ आरोपांना किती थारा द्यायचा, हाही प्रश्न आहेच. कारण, यापूर्वीही ‘राफेल’चे प्रकरण असेल अथवा ‘पॅगेसस’, राहुल गांधी तोंडावरच आपटले आहेत. ‘चौकीदार चोर हैं’चा कंठशोष केल्यानंतरही न्यायालयात नाक घासून कशी माफी मागावी लागली होती, तेही अल्पमतीचे राहुल गांधी कदाचित विसरलेच असावे. तेव्हा आपण मोदी सरकारविरोधात आंदोलने केली, यात्रा काढल्या, आरोपांच्या लड्या पेटवल्या तरी ‘हात’ शेवटी रिकामाच राहणार, हे राहुल गांधीही म्हणा ओळखून आहेतच. त्यातच विरोधकांची एकजूट झाली तरी राहुल गांधींसारख्या बालिश आणि वाचाळ राजकारण्याला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याची चूकही कोणी करणार नाही.

ममतादीदींनीही म्हणूनच २०२४ साठी ‘एकला चलो रे’ची भूमिका अलीकडेच स्पष्ट केलेली दिसते. तेव्हा, राष्ट्रीय राजकारणातही राहुल गांधींची विश्वासार्हता रसातळाला गेलेली. त्यामुळेच देशातून नाही, तर मग विदेशातून का होईना, राजकीय बलवर्धन करण्याचा राहुल गांधींचा हा सगळा केविलवाणा प्रयत्न!म्हणूनच तर त्यांच्या ब्रिटनमधील प्रत्येक दौर्‍यात राहुल गांधी केवळ पंतप्रधान मोदी, भाजपच नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मुळावरच उठले. जणू राहुल गांधी आणि तमाम विरोधकांनी ही खूणगाठच बांधलेली दिसते की, आपली सत्ता नाही म्हणजे भारतात लोकशाहीचे राज्यच नाही. राहुल गांधींसारख्या राजकीय संधीसाधूंनी हाच अपप्रचार आता देशभर केला आणि आता परदेशातही तीच री ओढताना ते दिसतात. पण, हे करताना इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीचा काळा कालखंड, दिल्लीतील शीखांचे काँग्रेसने केलेले शिरकाण मात्र ते सोयीस्कररित्या विसरतात.

सोरोस आणि त्याच्यासारख्या भारताचा विकास आणि भारतीयांची वाढती जागतिक उंची डोळ्यात खुपणार्‍या मंडळींचीच राहुल गांधी यांना साथ मिळताना दिसते. कारण, भारताची प्रगती, मोदींची वैश्विक प्रतिमा ही मुळी अजूनही भारताला ‘गारुड्यांचा देश’ मानणार्‍या या निबुर्द्धांच्या पचनीच पडलेली नाही. परिणामी, आर्थिक, राजकीय अथवा अन्य माध्यमांतून भारताला फक्त खाली कसे खेचायचे, याच्याच नसत्या उठाठेवींना वेग आलेला दिसतो. त्यातच मोदी सरकारने परदेशी ‘एनजीओं’चे भारतातील फंडिंगचे दरवाजेच बंद केल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्जविरोधी, दहशतवादविरोधी अभियान गतिमान केल्याने अनेकांचे दाबे दणाणले आहेत. तेव्हा अशाच सगळ्या असंतुष्ट, विघ्नसंतोषी पुरोगाम्यांच्या, माओवाद्यांच्या जोरावरच राहुल गांधी परदेशातून बेटकुळ्या फुगवत आहेत. पण, राहुल गांधींनी एक लक्षात ठेवावे - हा पूर्वीचा भारत नाही. हा नवीन भारत, जागृत आणि आत्मविश्वासाने भारलेला भारत आहे. तो राहुल गांधींसारख्यांच्या देशीविदेशी राष्ट्रद्रोही अजेंड्याला सहनही करणार नाही आणि त्याला बळीही पडणार नाही!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.