मुंबई : दाक्षिणात्य सुप्रसिद्ध नाटककार प्रशांत नारायणन २८ डिसेंबर रोजी तिरुवअनंतपुरम येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. प्रशांत यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस त्यांच्यावर फुफ्फुसाच्या आजारावर उपचार देखील सुरू होते.
प्रशांत नारायणन यांनी लेखक, दिग्दर्शक म्हणून तीन दशकांपेक्षा अधिक काळ दाक्षिणात्य चित्रपट आणि नाट्यसृष्टीत व्यथीत केली. प्रशांत यांनी जवळपास ६० नाटकांचे दिग्दर्शन केले असून २५ नाटकांची पटकथाही लिहिली होती. प्रशांत नारायणन यांचे मोहनलाल आणि मुकेश यांची प्रमुख भूमिका असलेले 'छायामुखी' नाटक केरळमधील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आले होते.
नारायणन यांनी 'मणिकर्णिका', 'ताजमहाल' आणि 'कारा' यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. नारायणन यांना २००३ मध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनासाठी केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. तसेच, प्रशांत यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते,.