२५ डिसेंबरला होणार ट्रान्स हार्बर लिंक रोडचं उद्घाटन! अटलजींच्या नावाने ओळखला जाणार
21-Nov-2023
Total Views |
मुंबई : 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' (MTHL), भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणारा, पुढील महिन्यात लोकांसाठी खुला केला जाणार आहे. २५ डिसेंबरला ट्रान्स हार्बर लिंक रोडचं उद्घाटन पार पडेल. पुलाचे ९७ टक्के काम पूर्ण झाल्याचे समजते आहे. तर, उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल असे एजन्सीचे म्हणणे आहे. यास, अटलबिहारी सेतू असे नाव देण्यात आले आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल असेल, ज्यातून दररोज ७० हजारांहून अधिक वाहने ये-जा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. भाजपने एमटीएचएलच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली असली तरी महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी मे महिन्यात एमटीएचएलला भेट दिली होती आणि शेवरी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकवरही गाडी चालवली होती.
या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर आता केवळ २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुंबई ट्रान्स हार्बर लिंकबद्दल विश्वविक्रमी आकडे समोर आणले होते. 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उभारण्याकरिता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच ९,७५,००० घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. बुर्ज खलिफाच्या ३५ पट उंचीच्या म्हणजेच सुमारे ३५ किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर करण्यात आला आहे. शिवाय, १७ आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे १,७०,००० मे. टन स्टीलच्या सळ्यांचा वापर करण्यात आला आहे.'
'दक्षिण मुंबईला रायगडशी जोडणारी अखंड व थेट कनेक्टिव्हिटी. यामुळे मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे-द्रूतगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर कमी होणार आहे. जगातील 10 व्या क्रमांकाचा व भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्र सेतू आहे. यामध्ये ऑर्थोट्रॉपीक स्टील डेक तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर करण्यात आला आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 कि. मी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर केला आहे. इंधन, वाहतूक खर्च व वेळेत 1 तासाची बचत होणार आहे. ओपन रोड टोलिंग सिस्टिम असलेला देशातला पहिलाच प्रकल्प असणार आहे.' अशी महत्त्वाची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.