अॅपल भारतात रचणार नवा विक्रम! १ लाख कोटींचे उत्पादन तर ४० हजार कोटींची निर्यात
21-Nov-2023
Total Views |
मुंबई : जगप्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी अॅपल भारतात नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. अॅपल कंपनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत एक लाख कोटी रुपयांचे आयफोन बनवण्याची योजना आखत आहे. याद्वारे अॅपल भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.
कंपनीने पहिल्या सात महिन्यांत ६० हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या आयफोनचे उत्पादन केले होते. भारत ही स्मार्टफोनची अग्रगण्य बाजारपेठ आहे. भारतात उत्पादित होणार्या आयफोनपैकी ७० टक्के आयफोन निर्यात केले जातात. आतापर्यंत, अॅपलने या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ४० हजार कोटींची निर्यात केली आहे.
भारतातून ४० कोटींची निर्यात करणारा अॅपल ही पहिलीच मोबाईल कंपनी आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत अॅपलच्या निर्यातीत १८५ टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत कंपनीने १४ हजार कोटी रुपयांचे आयफोन निर्यात केले होते.
यापूर्वी अॅपलचे बहुतांश उत्पादन चीनमध्ये केले जात होते. पण अमेरिका-चीन यांच्या व्यापारयुद्ध आणि चीनच्या झिरो कोव्हीड पॉलिसीमुळे कंपनीने आपले उत्पादन अन्य देशात हलवायला सुरुवात केली आहे. मागच्या दोन वर्षात अॅपलने भारतात १२ ते १५ या जनरेशनमधील आयफोनच्या सर्व मॉडेल्सचे उत्पादन सुरू केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.